वास्तव्यासाठी देशात अव्वल ठरलेल्या पुण्यात अनियमित पाणीपुरवठा
वास्तव्यास योग्य असलेल्या शहरात देशपातळीवर अव्वल ठरलेल्या पुण्यात पाणीपुरवठय़ाचे चित्र मात्र विसंगत असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्मार्ट सिटीमध्ये क्षेत्रनिहाय निवड झालेल्या आणि विकसित भाग अशी ओळख असलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी भागातच अनियमित पाणीपुरवठा होत असून त्या विरोधात काही दिवसांपूर्वी न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती. त्याचबरोबर पूर्व भागातही पाणीपुरवठा अनियमित आणि विस्कळीत होत असल्याच्या तक्रारी सातत्याने केल्या जात आहेत. भामा-आसखेड पाणीपुरवठा योजना आणि शहराला अखंड चोवीस तास पाणीपुरवठा योजना अद्यापही मार्गी लागलेल्या नाहीत. त्यामुळे अव्वल ठरलेल्या पुण्यातील पाणीपुरवठय़ाचे चित्र कागदोपत्री दुसऱ्या क्रमांकावर असले तरी प्रत्यक्षात पाणीपुरवठय़ातील विसंगती आढळून येत आहे.
पुणेकरांकडून पाण्याचा अतिरिक्त वापर होतो, असा आरोप नेहमी केला जातो. महापालिकेच्या आकडेवारीनुसार प्रतिमाणशी १३५ लीटर पाणीपुरवठा मानकानानुसार करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र त्यापेक्षाही हा पाणीपुरवठा अधिक होतो, हीच विसंगती पाणीपुरवठय़ामध्ये दुसरा क्रमांक पटकाविलेल्या पुणे शहरात आहे.
शहराची लोकसंख्या सध्या ३५ लाखांच्या आसपास आहे. त्यापैकी पाच ते सहा लाख लोकसंख्येला पाणी मिळत नाही. उर्वरित लोकसंख्येवर आवश्यकतेहून अधिक पाण्याची उधळपट्टी होत आहे. जलसंपदा विभागाकडून पुण्याला होणारा वार्षिक पाणीपुरवठा, दर महिन्याचा पाणीपुरवठा आणि लोकसंख्येचे प्रमाण लक्षात घेतले तर हे प्रमाण तीनशे लीटरहून अधिक होत असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. धरणातील पाण्याचे होणारे बाष्पीभवन, पाणीगळती आणि चोरी हे प्रकार लक्षात घेतल्यानंतरही एवढा मुबलक पाणीपुरवठा होत असतानाही पुणेकरांना पाणीकपातीला का तोंड द्यावे लागत आहे, असा प्रश्नही या निमित्ताने सातत्याने उपस्थित होत आहे.
एका बाजूला ही परिस्थिती असताना स्मार्ट सिटीमध्ये क्षेत्रनिहाय म्हणून समावेश करण्यात आलेल्या औंध-बाणेर-बालेवाडी या भागांत पाणीपुरवठय़ाची तीव्र समस्या आहे. या भागाला विस्कळीत स्वरूपात पाणीपुरवठा होत असल्यामुळे काही महिन्यांपूर्वी महापालिकेविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल करण्यात आली होती.
त्यावरून न्यायालयाने महापालिकेवर ताशेरे ओढताना या पूर्ण झालेल्या बांधकामांना भोगवटापत्र आणि चालू बांधकामांना पूर्णत्वाचा दाखला देऊ नये, असे आदेश दिले होते. अद्यापही या भागातील ही समस्या कायम आहे. त्यामुळे पुन्हा न्यायालयात जाण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
शहराच्या पूर्व भागातील म्हणजे कळस, धानोरी, विश्रांतवाडी, फुलेनगर, टिंगरेनगर, येरवडा, वडगावशेरी या भागांत पाणीपुरवठय़ाच्या अनेक तक्रारी आहेत. या भागात रात्री-अपरात्री पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. या भागातील स्थानिक नगरसेवकांनीही त्या विरोधात महापालिकेच्या मुख्य सभेत सातत्याने आंदोलने केली आहेत. मात्र हा प्रश्न प्रशासनाला सोडवता आलेला नाही. यातच या भागातील पाणीपुरवठय़ासाठी उपयुक्त ठरणारी भामा-आसखेड पाणीपुरवठा योजनाही रखडली असल्याची वस्तुस्थिती आहे. या पाश्र्वभूमीवर पाणीपुरवठय़ामध्येही पुण्याने दुसरा क्रमांक पटाकावला आहे, हेच विशेष ठरत आहे.
समान पाणीपुरवठय़ाला भूसंपादनाचा अडथळा
शहराची भौगोलिक परिस्थिती, पाणी वितरणातील असमानता आणि त्रुटी लक्षात घेऊन शहराला अखंडित चोवीस तास पाणीपुरवठा करण्याची महत्त्वाकांक्षी योजना महापालिकेने हाती घेतली आहे. मात्र या योजनेंतर्गत अद्यापही कामे सुरू झालेली नाहीत. पाण्याच्या साठवणूक टाक्यांच्या उभारणीसाठी भूसंपादनाचा अडथळा या योजनेपुढे आहे. शहराच्या पाणीपुरवठय़ाचा चेहरामोहरा बदलणारी ही योजना निर्धारित वेळेत पूर्ण होणार का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
