पुणे : करोना संशयित व्यक्तींचे चाचणीसाठी घेतलेल्या नमुन्यांचे अहवाल २४ तासांत देण्याचे खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. हे अहवाल रुग्ण ज्या भागातील आहे, म्हणजेच पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिका, ग्रामीण भागासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याकडे सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी बुधवारी दिल्या.

खासगी प्रयोगशाळा चालकांच्या बैठकीत विभागीय आयुक्त डॉ. म्हैसेकर यांनी या सूचना के ल्या. सर्व प्रयोगशाळा चालकांनी दररोज सायंकाळी सहा वाजेपर्यंत दिलेल्या नमुन्यातील अहवाल न चुकता आरोग्य उपसंचालक कार्यालयाकडे सादर करावेत. चाचणीबाबत आरटी-पीसीआरवर विदा (डाटा) दररोज अद्ययावत करण्यात यावा, दैनंदिन अहवाल सनियंत्रण अधिकाऱ्यांना देण्यासाठी प्रत्येक प्रयोगशाळेने एक समन्वय अधिकारी नियुक्त करावा. या समन्वय अधिकाऱ्यांचा दूरध्वनी क्रमांकही प्रशासनाला कळवण्यात यावा, अशा सूचना डॉ. म्हैसेकर यांनी या वेळी के ल्या.

दरम्यान, रक्तद्रव दान करण्याची प्रक्रिया ही रक्तदान करण्याच्या प्रक्रियेसारखीच आहे. रक्तद्रव उपलब्ध करण्यासाठी अत्याधुनिक यंत्र वापरले जाते. या यंत्राद्वारे के वळ रक्तद्रव घेतला जातो आणि बाकीचे रक्त दान करणाऱ्या व्यक्तीला परत दिले जाते. रक्तद्रव दान करणारी व्यक्ती १८ ते ६० वयोगटातील असावी. रक्तद्रव देणाऱ्या करोनामुक्त व्यक्तीची वैद्यकीय तपासणी व इतर चाचण्या के ल्या जातात. संबंधित व्यक्ती वैद्यकीयदृष्टय़ा पात्र असेल, तरच त्या व्यक्तीचे रक्तद्रव घेतले जाते. या सर्व प्रक्रियेसाठी दीड ते दोन तास लागतात. रक्तद्रव देणाऱ्या व्यक्तीला अशक्तपणा किं वा थकवा जाणवत नाही. म्हणून सर्व करोनामुक्त व्यक्तींनी रक्तद्रव दान करून गंभीर करोना रुग्णांना जीवनदान द्यावे, असे आवाहन डॉ. म्हैसेकर यांनी केले.

रक्तद्रव (प्लाझ्मा) दान करण्याचे प्रमाण अत्यल्प

करोना आजारातून उपचाराअंती बरे झालेल्या व्यक्तींचे रक्तद्रव, करोनाबाधित गंभीर रुग्णाला दिल्यास त्या रुग्णाचा जीव वाचवण्याची शक्यता असते, हे वैज्ञानिक संशोधनातून सिद्ध झाले आहे. मात्र, करोनातून बऱ्या झालेल्या व्यक्ती रक्तद्रव दान करण्यासाठी पुढे येत नसल्याने गंभीर करोना रुग्णांना रक्तद्रव उपलब्ध होत नाही. त्यामुळे करोनातून बऱ्या झालेल्या व्यक्तींनी रक्तद्रव दान करण्याचे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी के ले.