राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुणे जिल्ह्य़ातील मावळ व शिरूर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचे खासदार निवडून गेल्याने जोरदार झटका बसलेल्या राष्ट्रवादीने त्यातून काही धडा घेतला वा काही सुधारणा केल्याचे दिसत नाही. अजूनही पक्षातील गटबाजी आणि नेत्यांचे पराकोटीला गेलेले हेवेदावे कायम आहेत. मुंबईत झालेल्या बैठकीत खुद्द पक्षाध्यक्षांनाही याची प्रचिती आली आहे.  या दोन्ही जागा खेचून आणण्यासाठी पक्षनेतृत्वाला मोठय़ा डोकेदुखीला सामोरे जावे लागणार आहे.
आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या तयारीसाठी मुंबईत पक्षाध्यक्ष शरद पवार व प्रदेशाध्यक्ष मधुकर पिचड, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या बैठकीत दोन्हीही मतदारसंघातील गटबाजीचे चित्र पक्षनेतृत्वास प्रकर्षांने दिसून आले. आमदार विलास लांडे, लक्ष्मण जगताप, अण्णा बनसोडे, शहराध्यक्ष योगेश बहल तसेच मावळातील कृष्णराव भेगडे, मदन बाफना, माउली दाभाडे, खेडचे आमदार दिलीप मोहिते, शिरूरचे आमदार अशोक पवार, मंगलदास बांदल आदी दोन्ही मतदारसंघातील नेते उपस्थित होते.मावळचे यापूर्वीचे उमेदवार आझम पानसरे तसेच लोकसभेची मोर्चबांधणी सुरू केलेले माजी महापौर संजोग वाघेरे बैठकीला उपस्थित नव्हते.
मागील लोकसभा निवडणुकीत आझम पानसरे व विलास लांडे या दोघांचा मोठय़ा फरकाने पराभव झाला. पक्षातील काही नेत्यांनी विरोधात काम केल्याने पराभव झाल्याच्या तक्रारी त्यांनी केल्या होत्या. स्थानिक पातळीवर राष्ट्रवादीची सत्ता आणि वरचष्मा असताना शिवसेनेचे खासदार निवडून आल्याने त्यांच्या आरोपांना पुष्टी मिळत होती. िपपरी पालिकेची सत्ता मिळाल्यानंतर झालेल्या विजयी सभेत अजितदादांनी मागील चुका सुधारून मावळ, शिरूरचे खासदार निवडून आणा, असे कळकळीचे आवाहन केले होते. प्रत्यक्षात दोन्ही ठिकाणी आजही नेत्यांमधील गटबाजीचे राजकारण कायम आहे. पवार यांच्यासमोरच मावळच्या स्थानिक नेत्यांमध्ये झालेले वाक्युध्द तसेच शिरूरच्या आमदारांवर झालेली टीका हा त्याचाच एक भाग असल्याचे मानले जाते. ‘साहेबां’ नी मनावर घेतले तरच त्यांच्यातील ‘पॅचअप’ शक्य आहे. ही गटबाजी कायम राहिल्यास पराभवाची परंपरा कायम राहील, हे सांगण्यास ज्योतिषाची गरज नाही.

सुनील तटकरे रिंगणाबाहेर ?
मंत्र्यांना लोकसभेच्या िरगणात उतरविणार असल्याची जोरदार तयारी राष्ट्रवादीत सुरू आहे. त्यामुळे जलसंपदामंत्री सुनील तटकरे  यांचे मावळसाठी नाव चर्चेत होते. तथापि, स्वत: तटकरे यांनी खालच्या भागातील उमेदवार न देता वरच्या भागातून अर्थात िपपरी-चिंचवड अथवा मावळ भागातून उमेदवार द्यावा, त्यास आम्ही निवडून आणू, अशी भूमिका मांडली. तेव्हा सर्वाच्याच भुवया उंचावल्या.