प्रलंबित, शिफारसी न केलेल्या बारा परीक्षांसंदर्भात एमपीएससीकडून सूचना
पुणे : सामाजिक व आर्थिकदृष्टय़ा मागास प्रवर्गाचा (एसईबीसी) दावा केलेल्या उमेदवारांना पात्रतेनुसार आर्थिकदृष्टय़ा दुर्बल घटकाच्या (ईडब्ल्यूएस) आरक्षणाचा लाभ घेता येणार आहे. त्यानुसार महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) डिसेंबर २०१८ नंतर प्रसिद्ध के लेल्या जाहिरातींनुसार एसईबीसी प्रवर्गासाठी आरक्षित पदांच्या आधारे घेण्यात आलेल्या भरती प्रक्रियेतील विविध टप्प्यावर प्रलंबित आणि शिफारसी न के लेल्या बारा परीक्षांच्या बाबतीत एसईबीसी आरक्षणाचा दावा के लेल्या उमेदवारांना १७ ते २३ जून या मुदतीत खुला किं वा ईडब्ल्यूएस यातील विकल्प ऑनलाइन प्रक्रियेद्वारे निवडावा लागणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने एसईबीसी आरक्षण रद्द के ल्यानंतर राज्य शासनाने एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ देण्याचा निर्णय घेतला आहे. या पाश्र्वभूमीवर एमपीएससीकडून या बाबतचे प्रसिद्धिपत्रक संके तस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. त्यानुसार महाराष्ट्र वनसेवा मुख्य परीक्षा २०१९, पशुधन विकास अधिकारी गट अ, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९, महाराष्ट्र विद्युत सेवा अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०१९, राज्य सेवा पूर्व परीक्षा, सहायक मोटार वाहन निरीक्षक पूर्व परीक्षा २०२०, सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त गट अ, मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी गट ब, महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट अ संयुक्त पूर्व परीक्षा २०२०, महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा २०२०, वरिष्ठ संशोधन अधिकारी गट अ आदिवासी विकास विभाग, अनुवादक (मराठी) गट अ या बारा परीक्षांतील एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना खुला किं वा ईडब्ल्यूएस यापैकी विकल्प निवडावा लागणार असल्याचे स्पष्ट के ले आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांनी करायची कार्यवाही आणि काही महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
दिलेल्या मुदतीत आरक्षणाचा दावा सादर न करणाऱ्या उमेदवारांचा विचार के वळ खुल्या पदावरील निवडीसाठी के ला जाईल. विकल्प सादर के लेल्या किं वा न के लेल्या उमेदवारांना पुन्हा दाव्यात बदल करता येणार नाही, एसईबीसी प्रवर्गाचा दावा के लेल्या उमेदवारांनी आयोगाच्या ४ जानेवारी २०२१च्या प्रसिद्धिपत्रकानुसार कोणत्याही परीक्षांसाठी या पूर्वी विकल्प सादर के ला असल्यास पुन्हा नव्याने विकल्प सादर करणे आवश्यक आहे.
नव्याने विकल्प न दिलेल्या उमेदवारांचा खुल्या पदांवरील निवडीसाठी विचार के ला जाईल. खुल्या आणि ईडब्ल्यूएस घटकाच्या लाभासाठी विकल्प सादर करणाऱ्या उमेदवारांनी संबंधित जाहिरातीमध्ये विहित के लेल्या अटींची पूर्तता करणे अनिवार्य आहे. ईडब्ल्यूएस आरक्षणाचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवारांना ३१ मे २०२१ च्या शासन निर्णयानुसार सक्षम प्राधिकाऱ्याकडून प्रमाणपत्र घेऊन प्रमाणपत्र पडताळणीवेळी सादर करणे आवश्यक आहे. अर्ज के लेल्या प्रत्येक परीक्षेसाठी विकल्प निवडणे अनिवार्य असल्याचे नमूद करण्यात आले आहे.