करोना विषाणूंची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता आपण या काळात प्रत्येक सण उत्सव साध्या पद्धतीने साजरे केले आहेत. तसाच यंदाचा गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करूयात, असे आवाहन महापौर मुरलीधर मोहोळ यांनी गणेश मंडळांना केले आहे.

यंदाच्या वर्षी गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर आज पुणे महापालिकेत महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. या बैठकीला स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, महापालिका आयुक्त विक्रमकुमार, सहपोलीस आयुक्त रवींद्र शिसवे तसेच शहरातील गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी महापौर मोहोळ म्हणाले, दरवर्षी आपण सर्वजण गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करतो. मात्र, यंदा आपण करोनाच्या संकटाचा सामना करीत असून करोनासारख्या विषाणूंचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. या आजाराची रुग्णसंख्या नियंत्रणात आणण्याच्या दृष्टीने प्रशासन युद्ध पातळीवर काम करीत आहे. हे लक्षात घेता यंदाचा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करूयात, गणेश मंडळांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. तसेच कोणत्याही स्वरूपाच्या मिरवणुका काढण्यात येणार नसून भाविकांना डिजिटलच्या माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करावी. त्याचबरोबर गणेशमूर्तीचे विसर्जन मंडळांच्याजवळच तर घरगुती गणपतींचे विसर्जन घरीच करावे, असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

महापालिकेने प्रत्येक मंडळाला १ लाखांची मदत द्यावी

गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर दरवर्षी महापौरांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडते. यंदा देखील ही बैठक झाली. यामध्ये अनेक मुद्दे मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मांडले असून यामध्ये यंदा करोना विषाणूमुळे बाजारपेठेतील अर्थकारण ठप्प झाले आहे. व्यापारी वर्ग हा आमचा वर्गणीदार असल्याने त्यांच्याकडे देखील पैसे नाहीत. यामुळे सर्व मंडळे आर्थिक दृष्टया मोठ्या संकटात आहेत. त्यामुळे महापालिकेने 10 बाय 10 च्या मंडपाचा खर्च उचलावा. तसेच प्रत्येक मंडळांना महापालिकेने १ लाख रुपयांची मदत करावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी बैठकीवेळी केली.