संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांची माहिती

१५.८४ एकर जागा भाडेतत्त्वावर देण्यास हवाई दलाने मान्यता दिली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि हवाई दल यांच्यात भाडेकरार होण्यापूर्वी विमानतळ विस्तारीकरणाचे काम सुरू करणे शक्य आहे, अशी माहिती संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली. सुरक्षेच्या कारणामुळे हवाई दलाच्या विमानांच्या सराव उड्डाणाच्या वेळेबाबत हवाई दलाकडून यापुढे तडजोड करणे अशक्य आहे. त्यामुळे पुण्याच्या हवाई वाहतुकीसाठी येत्या काळात नवीन विमानतळ बांधणे आवश्यक असल्याचे र्पीकर यांनी सांगितले.

विमानतळ विस्तारीकरणासाठी र्पीकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला. पालकमंत्री गिरीश बापट, सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे, खासदार अनिल शिरोळे, आमदार जगदीश मुळीक, योगेश टिळेकर, महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांच्यासह भारतीय हवाई दलाचे आणि भारतीय विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.

केंद्रीय भुपृष्ठमंत्री नितीन गडकरी यांनी २५ ऑक्टोबर २०१५ रोजी पुण्यामध्ये घेतलेल्या बैठकीत हवाई दलाने विस्तारीकरणासाठी १५ एकर जागा देण्यास मान्यता दिली असल्याचे सांगितले होते.

मात्र, तांत्रिक अडथळ्यांमुळे विस्तारीकरणाचे काम तसेच जागा हस्तांतरण रखडले होते. र्पीकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी झालेल्या बैठकीमध्ये या अडथळ्यांवर मार्ग निघाल्याने जागा हस्तांतरणाची वाट मोकळी झाली आहे.

विमानतळ प्राधिकरणाला देण्यात येणाऱ्या जागेतून हवाई दलाची डेटा केबल जाते. ही डेटा केबल हवाई दल स्वत:च दुसरीकडे हलविणार आहे. तसेच प्रत्यक्ष काम सुरू करताना सुरक्षेसाठी संरक्षक भिंत उभारावी लागणार आहे. तर, त्या जागेतील रस्ता दुसरीकडे वळविला जाणार असून ही दोन्ही कामे विमानतळ प्राधिकरणाकडून केली जाणार असल्याचे र्पीकर यांनी सांगितले.

पुण्याकडून विमानतळाकडे येण्यासाठी सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्याव्यतिरिक्त आणखी एक पर्यायी रस्ता करण्यासाठी हवाई दलाची जागा देण्यास तत्त्वत: मान्यता देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सध्याच्या रस्त्याचेही रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या आवश्यक बाबींची पूर्तता करावी, अशा सूचनाही सर्व संबंधितांना देण्यात आल्या असल्याचेही र्पीकर यांनी सांगितले.

त्यामुळे विमानतळ परिसरात होणारी वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे.