तापमानाचा पारा खाली आल्याने पुणेकरांना हुडहुडी भरली असतानाच शुक्रवारी (१२ नोव्हेंबर) पहाटे थंडीच्या लाटेची स्थिती निर्माण होऊन यंदाच्या हंगामातील कडाक्याची थंडी नागरिकांनी अनुभवली. इतकेच नव्हे, तर याच दिवशी पुणे शहरातील ९.८ अंश सेल्सिअस किमान तापमान राज्यातील नीचांकी तापमान ठरले. त्यामुळे संध्याकाळनंतर उबदार कपडे घातल्याशिवाय बाहेर पडणे कठीण झाले होते. मात्र, पुढील दोन-तीन दिवस तापमानात काही प्रमाणात वाढ होण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.

आकाशाची निरभ्र स्थिती आणि कोरडय़ा हवामानामुळे पुणे शहर आणि परिसरातही थंडीला अनुकूल वातावरण आहे. परिणामी ६ नोव्हेंबरपासूनच किमान तापमानात घट सुरू झाली होती. या दिवशी १३.८ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली. दुसऱ्याच दिवशी त्यात आणखी घट होऊन तापमान १३.३ अंशांपर्यंत खाली आले. ८ आणि ९ नोव्हेंबरला त्यात किंचित वाढ झाली. मात्र, १० नोव्हेंबरपासून किमान तापमानात पुन्हा घट सुरू झाली. या दिवशी शहरातील किमान तापमानाचा पारा ११.३ अंशांपर्यंत खाली आला. ११ नोव्हेंबरला त्यात आणखी घट होऊन १०.६ अंशांपर्यंत पारा आला. १२ नोव्हेंबरला मात्र यंदाच्या हंगामात प्रथमच दहा अंशांच्या खाली तापमानाची नोंद झाली. गुरुवारी दिवस मावळताच अंगाला झोबणारे थंड वारे वाहत होते. शुक्रवारी पहाटे हुडहुडी भरविणारी थंडी होती.

नोव्हेंबरच्या तापमानाचा नीचांक

पुणे शहरामध्ये गुरुवारी (१२ नोव्हेंबर) ९.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याने नोव्हेंबरमधील तापमानाचा नीचांक नोंदविला गेला. नोव्हेंबरच्या पंधरवडय़ात गेल्या दहा वर्षांत किमान तापमानाचा पारा कधीही १० अंशांखाली गेलेला नाही. २०१७ मधील १३ तारखेला नीचांकी ११.४ अंश किमान तापमान होते. संपूर्ण नोव्हेंबरमधील किमान तापमानाचे नीचांक पाहिल्यास गेल्या दहा वर्षांत १९ नोव्हेंबर २०१२ रोजी ७.९ अंश सेल्सिअस, २७ नोव्हेंबर २०१६ रोजी ९.३ अंश, तर १७ नोव्हेंबर २०१३ रोजी ९.९ अंश किमान तापमानाची नोंद झाली होती. त्यामुळे १२ नोव्हेंबरला नोंदलेले शहरातील किमान तापमान नोव्हेंबरमधील आणखी एक नीचांक ठरला आहे.

थंडीची लाट कशी?

कोरडे हवामान आणि निरभ्र आकाशाची स्थिती थंडीस अनुकूल ठरते. त्यातच उत्तरेकडून थंड वारे वाहू लागल्यास महाराष्ट्रातही थंडीत वाढ होते. तीच स्थिती सध्या राज्यात आणि पुण्यातही आहे. किमान तापमान १० अंश सेल्सिअसखाली गेल्यास आणि सरासरीच्या तुलनेत हे तापमान ४.५ अंशांपेक्षा कमी असल्यास ती थंडीची लाट समजली जाते. गेल्या काही दिवसांत विदर्भातील चंद्रपूर आणि मराठवाडय़ातील परभणी येथेही हीच स्थिती निर्माण झाली होती. पुण्यात शुक्रवारचे ९.८ अंश तापमान आणि सरासरीच्या तुलनेत ४.९ अंशांनी तापमान कमी असल्याने ही थंडीच्या लाटेची स्थिती ठरली.

तापमानची पुढील स्थिती

शहरात तीन दिवसांपासून तापमानात मोठी घट नोंदवली जात आहे. पुढील आठवडाभर आकाशाची स्थिती मुख्यत: निरभ्र राहणार असल्याचा अंदाज आहे. मात्र, पुढील दोन दिवसांनंतर तापमानात चढ-उतार होत राहणार आहेत.

१४ आणि १५ नोव्हेंबरला रात्रीच्या किमान तापमानात काही प्रमाणात वाढ होणार आहे. याच काळात दिवसाचे कमाल तापमानही वाढणार आहे. १६ नोव्हेंबरपासून किमान तापमानात पुन्हा घट होण्यास सुरुवात होईल. १७ नोव्हेंबरला ते १० अंशांच्या आसपास येण्याची शक्यता पुणे वेधशाळेकडून व्यक्त करण्यात आली आहे.