20 November 2017

News Flash

नगरसेवकांच्या मानधनात वाढ

नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता.

प्रतिनिधी, पुणे | Updated: July 16, 2017 4:15 AM

पुणे महानगरपालिका

राज्य सरकारचा निर्णय; पुण्यात दरमहा २० हजार मानधन

राज्यातील सर्व महापालिकांमधील नगरसेवकांच्या मानधनात मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला असून महापालिकांच्या दर्जानुसार किमान दहा हजार ते कमाल पंचवीस हजार एवढे मानधन यापुढे नगरसेवकांना मिळणार आहे. महागाई वाढल्यामुळे नगरसेवकांच्या मानधनात वाढ करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता. त्यानुसार ही वाढ करण्यात आल्याचे शासनाने शनिवारी काढलेल्या अध्यादेशात नमूद करण्यात आले आहे. नव्या निर्णयानुसार पुण्याच्या नगरसेवकांचे मानधन मासिक वीस हजार होणार असून पंचवीस हजार इतके मानधन मुंबईच्या नगरसेवकांना मिळणार आहे.

शासनाच्या अध्यादेशानुसार पुणे महापालिकेच्या सदस्यांना दिल्या जाणाऱ्या मानधनात दुपटीहून अधिक वाढ झाली आहे. सध्या सदस्यांना साडेसात हजार रुपये एवढे मानधन मिळते. ते वीस हजार करण्यात आले आहे. पिंपरीच्या सदस्यांचे मानधन सात हजारांवरून पंधरा हजार होणार आहे. यापूर्वी मुंबई महापालिकेतील सदस्यांचे मानधन सन २००८ मध्ये आणि अन्य महापालिकांमधील सदस्यांचे मानधन सन २०१० मध्ये निश्चित करण्यात आले आहे. सन २०१० मध्ये नगरसेवकांचे मानधन साडेसात हजार करण्यात आले होते. महागाई वाढल्यामुळे महापालिका सदस्यांचे मानधन वाढवण्याचा प्रस्ताव राज्य शासनाच्या विचाराधीन होता. सदस्यांना लागणारी लेखनसामग्री, टपाल, दूरध्वनी आदींवरील खर्च विचारात घेऊन मानधन वाढवण्यात आल्याचे अध्यादेशात म्हटले आहे.

शासनाने राज्यातील महापालिकांचे अ अधिक (ए प्लस), अ, ब, क आणि ड असे वर्गीकरण केले असून अ अधिक वर्गातील महापालिका सदस्यांना पंचवीस हजार, अ वर्ग महापालिकांमधील सदस्यांना वीस हजार, ब वर्गातील महापालिका सदस्यांना पंधरा हजार आणि क व ड वर्ग महापालिकांना दहा हजार रुपये मानधन दिले जाणार आहे. अ अधिक वर्गात मुंबई  महापालिकेचा समावेश असून अ वर्गात पुणे आणि नागपूर या महापालिका येतात.

नगरसेवकांना दिल्या जाणाऱ्या मानधनासाठी महापालिकेचे बारा लाख बावन्न हजार पाचशे रुपये खर्च होत होते. हा खर्च यापुढे तेहेतीस लाख चाळीस हजार इतका होणार आहे.

First Published on July 16, 2017 4:14 am

Web Title: maharashtra government increase pmc corporator salary