पुणे : मुंबईसह कोकण विभाग वगळता मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी हलका गारवा कायम आहे. कोकण विभागातील किमान तापमानात वाढ  झाली असून, उर्वरित महाराष्ट्रात काही ठिकाणी अद्यापही किमान तापमान सरासरीच्या खाली आहे. पुढील काळात तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

उत्तरेकडील राज्यांत सध्या थंडीची लाट नसली, तरी या भागात हलके गार वारे वाहत आहेत. मुख्य म्हणजे राज्यात कमी दाबाचे पट्टे आणि दक्षिणेकडून येणारे उष्ण वारे निवळले आहेत. बहुतांश भागातील हवामान सध्या कोरडे आहे. दिवसा आणि रात्री आकाश निरभ्र राहात आहे. परिणामी किनारपट्टीचा भाग वगळता इतर ठिकाणी तापमानात घट असल्याने हलका गारवा आहे.

कोकण विभागात मुंबईसह इतर ठिकाणी किमान तापमानात मोठी वाढ झाली असून, ते २० ते २२ अंशांच्या पुढे गेल्याने गारवा गायब झाला आहे. मध्य महाराष्ट्रात पुणे, नाशिक, जळगाव, सोलापूर, महाबळेश्वर आदी भागात किमान तापमान सरासरीखाली असल्याने या भागात रात्रीची थंडी आहे. रविवारी नाशिक येथे राज्यातील नीचांकी १० अंश सेल्सिअस किमान तापमान नोंदविले गेले. मराठवाड्यातील औरंगाबाद आणि परभणी येथेही हलकी थंडी आहे. विदर्भातील सर्वच ठिकाणी किमान तापमान सरासरीखाली असल्याने तेथेही रात्री हलका गारवा जाणवतो आहे.