बाँब ठेवल्याचा दूरध्वनी पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला करून पोलिसांची दिशाभूल केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या माथेफिरू तरुणाने न्यायालयाकडून या गुन्ह्य़ात जामीन मिळविल्यानंतर पुन्हा पोलिसांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी (९ एप्रिल) त्या माथेफिरू तरुणाने पुन्हा पोलीस नियंत्रण कक्षाला शहरातील रेल्वेस्थानक, मॉलमध्ये बाँब ठेवल्याचा दूरध्वनी केल्याचे उघडकीस आले आहे. पुणे पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने त्याला गजाआड केले.
संजीवकुमार नकुल मिश्रा (वय ३९, रा. भुवनेश्वर, ओदिशा) असे अटक करण्यात आलेल्या माथेफिरू तरुणाचे नाव आहे. मिश्रा याला दारू आणि अमली पदार्थाचे व्यसन आहे. २३ जानेवारी २०१६ रोजी तो भुवनेश्वर येथून विमानाने मुंबईला आला होता. प्रवासात त्याच्याकडून एका महिलेच्या अंगावर चहा सांडला. त्यावेळी त्याने महिलेशी वाद घातला होता. तेथून तो पुण्याकडे येत असताना मुंबईतील वाहतूक पोलिसांनी त्याला अडविले. मोटारीच्या कागदपत्रांची माहिती घेतली. तेथून तो पुण्याला आला आणि मुंबई-भुवनेश्वर विमानात बाँब ठेवल्याचा दूरध्वनी त्याने पुणे पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला केला होता.
पुण्याहून तो पसार झाल्यानंतर पोलिसांनी मोबाईल क्रमांकावरून तपास करून त्याला त्याला पुणे-सोलापूर रस्त्यावर यवत येथे पकडले. त्याला अटक करण्यात आल्यानंतर तो येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता. १९ मार्च रोजी न्यायालयाकडून त्याला जामीन मिळाल्यानंतर तो कारागृहातून बाहेर पडला. सोमवारी (९ एप्रिल) त्याने पुणे रेल्वे स्थानक, मुंबईतील रेल्वे स्थानक आणि नगर रस्त्यावरील एका मॉलमध्ये बाँब ठेवल्याचा दूरध्वनी केला. त्यानंतर पुणे पोलिसांच्या दहशतवादविरोधी पथकाने तपास सुरू केला. कात्रज येथील एका लॉजमधून त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.

पोलिसांनी त्रास दिला म्हणून..
आरोपी मिश्रा हा व्यसनांच्या आहारी गेला आहे. त्याला पुणे पोलिसांनी ताब्यात घेऊन चौकशी केली. तेव्हा माझी चूक नसताना पोलिसांनी अटक केली. त्यामुळे पोलिसांना त्रास देत आहे. अटक केल्यानंतर मी पुन्हा कारागृहातून बाहेर येईल. पुन्हा दूरध्वनी करून पोलिसांना त्रास देणार असल्याचे मिश्रा याने पोलिसांना सांगितले.