01 March 2021

News Flash

‘इये मराठीचिये नगरी’त मायबोलीची ऐशीतैशी

या फलकामुळे नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक झाली आहे.

पक्ष्यांमुळे नाही, पक्षांमुळे अस्वच्छता, रोगराई पसरत असल्याची फलकबाजी

ॐकारेश्वर मंदिराबाहेरील शिंदे पुलाजवळील महापालिकेच्या विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाने लावलेला फलक चक्क कबुतरांच्या मुळावरच उठला आहे. नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकांनंतर येथे लावण्यात आलेल्या फलकावरील मजकूर वाचल्यानंतर पक्ष आणि पक्षी हे दोन्ही शब्द समानार्थी असल्याचे पहायला मिळत आहे. मराठी भाषा दिन मोठय़ा अभिमानाने साजरा करीत असताना ‘इये मराठीचिये नगरी’मध्ये मराठी भाषेचीच ऐशीतैशी झाल्याचा हा प्रकार दिसत आहे.

क्षणात थव्याने उडणारा आणि निमिषात विसावून ज्वारीचा दाणा टिपत पाणी पिणारा कबुतरांचा थवा हे ॐकारेश्वर मंदिराबाहेरील महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुलाजवळील दृश्य डोळय़ांत साठवतच दुचाकीवरून किंवा पायी जाणारे पुणेकर येथून मार्गक्रमण करीत असतात. भूतदया म्हणून या कबुतरांना दाणापाणी देणारे नागरिकही या परिसरामध्ये आहेत. काही पक्षीप्रेमींची या कबुतरांशी मैत्री झाली आहे. मात्र, या पक्षीप्रेमींच्या भूतदयेवर आता महापालिकेने लावलेल्या फलकामुळे संक्रांत आली आहे.

‘या पक्षांमुळे परिसरात अस्वच्छता आणि रोगराई पसरत आहे. त्यामुळे येथे पक्षांना धान्य टाकण्यास मनाई करण्यात येत आहे’, अशी लाल अक्षरांतील सूचना देणारा फलक विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाचे विभागीय अधिकारी यांनी मंदिराबाहेर लावला आहे. या फलकामुळे नागरिकांची मात्र चांगलीच करमणूक झाली आहे. राजकीय पक्ष आणि कबुतरासारखा पक्षी हे महापालिकेच्या दृष्टीने सारखेच आहेत की काय, असा प्रश्न या फलकानिमित्ताने उपस्थित झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 28, 2017 3:37 am

Web Title: marathi language day omkareshwar temple destroy marathi language
Next Stories
1 पिंपरी ‘आरटीओ’तील सदोष संगणक प्रणालीमुळे नागरिक त्रस्त
2 वडगावशेरीतील राष्ट्रवादीचा गड नेस्तनाबूत
3 पिंपरी पालिकेत बाबर परिवारातील नवीन चेहरा
Just Now!
X