भविष्यातील ई-बुक वाचनाची वाढती संख्या ध्यानात घेऊन मराठीतील सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन ‘मराठी रीडर डॉट कॉम’ हे संकेतस्थळ विकसित केले आहे. त्यामुळे अभिजात साहित्य आता एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. या संकेतस्थळाच्या प्रारंभीच्या टप्प्यात पुस्तकांची मुद्रित प्रत मागविण्याबरोबरच ऑनलाईन खरेदीची सेवा देण्यात येणार असून पुढच्या टप्प्यामध्ये १५ ऑगस्टपर्यंत ई-बुक स्वरूपातील पुस्तक ‘डाऊनलोड’ करून घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
पॉप्युलर प्रकाशन, मौज प्रकाशन गृह, राजहंस प्रकाशन, कॉन्टिनेन्टल प्रकाशन, रोहन प्रकाशन आणि ज्योत्स्ना प्रकाशन या मराठीतील सहा प्रकाशकांनी एकत्र येऊन ‘मराठी रीडर डॉट कॉम’ या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या सर्व प्रकाशकांची पिंपरी-चिंचवड येथे होणाऱ्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनामध्ये या संकेतस्थळाविषयीची माहिती बॅनर्स आणि जाहिरातीच्या माध्यमातून साहित्यप्रेमींना मिळणार आहे.
सध्या तरी मुद्रित माध्यमातून वाचक पुस्तक वाचत आहेत. मात्र, आता ई-बुकच्या माध्यमातून वाचन करणाऱ्यांच्या संख्येमध्ये भर पडताना दिसून येत आहे. हा सामाजिक माध्यमाकडे वळणारा ओघ ध्यानात घेता हे पाऊल उचलण्याची आवश्यकता होती. लँडलाईन स्वरूपाच्या दूरध्वनीची जागा मोबाईलने घेतली आहे. मोबाईल ज्या गतीने विस्तारला त्याच गतीने येत्या १० ते १५ वर्षांंत ई-बुक वाचकांची संख्या वाढेल. त्यामुळे भावी वाचकांची गरज ओळखून हे पाऊल उचलले असल्याचे राजहंस प्रकाशनचे डॉ. सदानंद बोरसे यांनी सांगितले.
या संकेतस्थळावर पहिल्या टप्प्यामध्ये पुस्तकांची माहिती आणि संबंधित पुस्तकाचा गोषवारा देण्यात येणार आहे. ही पुस्तके मुदित प्रत माध्यमातून तसेच ऑनलाईन खरेदीही करता येतील. काही संकेतस्थळांवर डाऊनलोडची सुविधा उपलब्ध नाही. हे ध्यानात घेऊन नंतरच्या टप्प्यामध्ये ई-बुक स्वरूपातील पुस्तक शुल्क आकारून डाऊनलोड करून घेण्याची सुविधादेखील उपलब्ध होणार आहे, असे ज्योत्स्ना प्रकाशनचे मििलद परांजपे यांनी सांगितले. मोठय़ा वाचकवर्गाला या संकेतस्थळाच्या माध्यमातून सहा दर्जेदार प्रकाशकांकडे असलेले अभिजात साहित्य एकाच छताखाली पाहण्याची आणि आवडीची पुस्तके खरेदी करण्याची सोय झाली असल्याचे कॉन्टिनेन्टल प्रकाशनच्या देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी सांगितले.