स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विविध मागण्यांसाठी सोमवारपासून दूध संकलन बंद आंदोलनाला सुरुवात झाली आहे. पुण्याला दूध पुरवठा करणाऱ्या चितळे डेअरीचे दूध संकलन पूर्णपणे बंद झाले आहे, तर कात्रज दूध संघाकडे केवळ तीस टक्के दूध संकलन झाले आहे. परिणामी मंगळवारपासून पुण्यात दूध टंचाई होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दूध दरप्रश्नी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांच्या हस्ते सोमवारी सकाळी श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीला दुग्धाभिषेक करून पुण्यात आंदोलनाला सुरुवात करण्यात आली. आंदोलनात सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्य़ातून पुण्याकडे येणारी दुधाची वाहने अडवून दूध फेकून देण्यात येत आहे. दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्य़ात चितळे डेअरीकडून दररोज चार लाख लिटर, कात्रज दूध संघाकडून १.२५, अमूलकडून १.८०, सोनई आणि गोकुळकडून प्रत्येकी १.३०, कृष्णा डेअरीकडून २८ हजार आणि नंदन  डेअरीकडून ३० हजार लिटर असा दुधाचा पुरवठा होतो. रविवारी चितळे डेअरीचा पुरवठा सुरळीत झाला. मात्र, सोमवारपासून त्यांनी संकलन बंद ठेवले आहे. कात्रज दूध संघाचे फक्त तीस टक्के संकलन झाले असले तरी एवढय़ावर पुण्याची गरज भागणार नाही. अशीच परिस्थिती अन्य दूध संघांची असल्याने मंगळवारपासून पुण्यात दुधाची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.

‘दररोज दोन ते सव्वादोन लाख लिटर दूध संकलन होत असते. शेतकरी स्वत:हून दूध संकलन करत नाहीत. सोमवारी फक्त ३० टक्केच दूध संकलन झाले. पुणे शहराला आमच्याकडून दररोज सुमारे सव्वा लाख लिटर दुधाचा पुरवठा केला जातो. मंगळवारी फार परिणाम जाणवण्याची चिन्हे नसली, तरी आंदोलन सुरू राहिल्यास बुधवारपासून दुधाचा तुटवडा तीव्र होण्याची शक्यता आहे’, अशी माहिती कात्रज दूध संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी दिली, तर दूध दरप्रश्नी आंदोलनामुळे चितळे डेअरीचे संकलन पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे पुणे शहराला सोमवारी दूधपुरवठा करण्यात आला नाही. आंदोलन सुरू राहिल्यास दूध संकलन बंदच राहील, अशी माहिती चितळे डेअरीचे संचालक गिरीश चितळे यांनी दिली.

सुप्रिया सुळे यांचा आंदोलनाला पाठिंबा

महाराष्ट्रात दुधाला अठरा रुपयांच्या पुढे दर दिला जात नाही. गुजरात सरकारने त्यांच्या राज्यातील दूध व्यावसायिकांसाठी तीनशे कोटी रुपयांचे पॅकेज दिले आहे. मग महाराष्ट्र सरकार तसे का देऊ शकत नाही, असा सवाल उपस्थित करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला. सुळे यांच्यासह पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलनही केले.