ईव्हीएम विरोधात मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देशभरातील नेत्यांची भेट घेत आहे. ईव्हीएम विरोधात आंदोलन केले जाणार आहे. मात्र, त्या आंदोलनाचा काही एक फरक पडणार नाही. अशी भूमिका केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत मांडली. “राज ठाकरे यांच्याकडे काही उद्योग राहिला नाही. म्हणून ते देशभरातील नेत्यांच्या भेट घेत आहे. नेत्यांच्या भेटीगाठी घेण्यापेक्षा राज्यात मनसे कशी वाढेल याकडे राज ठाकरे यांनी लक्ष द्यावे,” असा सल्ला यावेळी रामदास आठवले यांनी दिला. ईव्हीएम बाबत राज ठाकरे यांच्या विधानावर त्यांनी भूमिका मांडली.

“ईव्हीएम मशीन हे काँग्रेसने आणले आहे. ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आणले नाही. त्यामुळे ईव्हीएमबाबत विरोधकांनी बोलता कामा नये. मतदानावेळी लोकांचा हात आपणहून कमळाकडे जात आहे. याला कोणी काही करू शकत नाही,” असे आठवले यावेळी म्हणाले. तसेच बारामतीत ईव्हीएम मशीन खराब नव्हते का? असा सवालही त्यांनी यावेळी केला. तसेच ते पुढे म्हणाले की, ”ईव्हीएम मशीनचा मुद्दा जाणीवपूर्वक काढला जात आहे. बँलेट पेपरवर निवडणुका घेतल्यास आमची तयारी आहे.”

यावेळी त्यांना विधानसभा निवडणुकीत रिपाइंने किती जागांची मागणी केली असा सवाल करण्यात आला. दरम्यान, आम्ही दहा जगांची मागणी केली असल्याचे आठवले म्हणाले. तसेच विधानसभा निवडणुकीनंतर एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद मिळावे आणि 5 महामंडळे देण्यात यावी, अशा आशयाचे पत्र मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि प्रकाश आंबेडकर यांची आघाडी होण्याची शक्यता कमी आहे. जरी त्यांना आघाडीत घेतले तरी महायुतीला काही फरक पडणार नसल्याचे त्यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. तसेच आता वंचित आघाडीतील काही नेते रिपाइंच्या मार्गावर असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, मॉबलिंचिंग बाबात कायदा करण्यास हरकत नसून यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेणार असल्याचे ते म्हणाले.