पुण्यातील प्रसिद्ध उद्योजक गौतम पाषाणकर बेपत्ता झाले असून त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून पथकं तयार करण्यात आली आहेत. कुटुंबीयांनी पोलिसांकडे गौतम पाषाणकर यांनी लिहिलेली चिठ्ठी सोपवली आहे ज्यामध्ये त्यांनी आपण आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला आहे. पुणे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी हिंदुस्तान टाइम्सशी बोलताना दिलेल्या माहितीनुसार, “शहरामध्येच त्यांचं शेवटचं लोकेशन होतं. याशिवाय त्यांनी एटीएममधून पैसेही काढले होते”.

“गौतम पाषाणकर यांचं शेवटचं लोकेशन शहरातच दाखवत आहे. याशिवाय एटीएममधून पैसे काढल्याचंही दिसत आहे. ५००० रुपये त्यांनी काढले. याशिवाय फोन फॉरमॅट करत सर्व माहिती डिलीट केली,” अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली आहे. गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार नोंद करण्यात आली आहे. त्यांचा मुलगा कपिल पाषाणकर यांनी दिलेल्या यासंबंधी तक्रार दिली होती. कपिल पाषाणकर यांनी एटीएममधून पैसे काढल्यासंबंधी आपल्याला काही कल्पना नसल्याचं म्हटलं आहे.

“त्यांनी गाडीत दोन फोन सोडले होते, जे चालकाने आणून दिले. मला कोणत्याही एटीएम व्यवहाराची माहिती नाही. दुर्दैवाने जे सीसीटीव्ही आहेत त्यामध्ये रस्ता दिसत नाही. त्यामुळे ते कोणत्या दिशेने गेले हे कळत नाही आहे. ट्रॅफिक चलानसाठी लावण्यात आलेला एक सीसीटीव्ही मेट्रोच्या कामामुळे बंद असल्याचं आम्हाला सांगण्यात आलं. आमच्या आयुष्यात ज्या काही समस्या होत्या त्या पाच वर्षांपूर्वी होत्या. सध्या परिस्थिती सामान्य आहे. आम्ही पुण्यात सर्वा मोठे ऑटोमोबाइल डिलर होतो. आज आम्ही जे काही करत आहोत त्यामागे कोणता निर्णय आहे हे माहित नाही. आम्ही १५० कोटींचं कर्ज फेडलं असून एक रुपयाही शिल्लक नाही. याशिवाय इतर सर्व कर्जही फेडण्यात आली आहेत,” अशी माहिती कपिल पाषाणकर यांनी दिली आहे.

पोलिसांनी गौतम पाषाणकर यांचा एक फोटो प्रसिद्ध केला आहे ज्यामध्ये ते शेवटचे दिसले आहेत. शिवाजीनगर पोलिसांनी जर कोणी त्यांना पाहिलं असल्यास किंवा इतर काही माहिती असेल तर आपल्याकडे येण्याचं आवाहन केलं आहे. पोलिसांनी याप्रकरणी चालकाचीही चौकशी केली आहे. सध्या गौतम पाषाणकर यांचा फोन स्विच ऑफ असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे.

नेमकं काय झालं होतं –
पुण्यातील प्रसिद्ध पाषाणकर उद्योग समूहाचे प्रमुख गौतम पाषाणकर बुधवारी बेपत्ता झाल्याची घटना समोर आल्यानंतर शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली. तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट समोर आली आहे. सुसाईड नोटमध्ये त्यांना व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं म्हटलं आहे.

“गौतम पाषाणकर हे बुधवारी नेहमीप्रमाणे ऑफिसच्या कामानिमित्त बाहेर पडले होते. पाषाणकर हे लोणी काळभोर येथील गॅस एजन्सीच्या ऑफिसमध्ये गेले. तेथून ते शिवाजीनगर येथील ऑफिसमध्ये आल्यावर एक बंद लिफाफा चालकाकडे दिला आणि हे घरी देण्यास सांगितले. चालक लिफाफा देण्यासाठी घरी गेला. त्यानंतर पाषाणकर ऑफिस मधून बाहेर पडले आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या दिशेने चालत निघून गेले. गौतम पाषाणकर घरी न आल्याने कुटुंबीयांनी अखेर पोलीस स्थानकात धाव घेतली,” अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आलं. मागील काही दिवसापासुन व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असल्याचं त्यांनी त्यात लिहिलं आहे.