ग्रामीण भागात सुटय़ा पैशांचा प्रश्न कायम

औषध दुकानांमध्ये दररोज येणाऱ्या ग्राहकांपैकी निम्मे लोक ‘कॅशलेस’ वापरू लागल्याचे सध्याचे चित्र आहे. पूर्वी ‘डेबिट’ वा ‘क्रेडिट’ कार्डचा पर्याय अजिबात उपलब्धच नसलेल्या अनेक औषध दुकानांमध्ये आता छोटी ‘एम स्वाइप’ मशिन्स दिसू लागली आहेत.

असे असले तरी अनेक दुकानदारांना कार्ड स्वाईप मशिन्सचा पुरवठाच न मिळणे आणि अजूनही काही भागात पाचशे आणि शंभरच्या नोटा पुरेशा उपलब्ध नसणे हे अडसर ठरत आहेत. विशेषत: ग्रामीण भागात सुट्टय़ा पैशांचा प्रश्न भेडसावतच असल्याचे निरीक्षण औषधविक्रेत्यांनी नोंदवले.

‘महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशन’चे पश्चिम महाराष्ट्र सचिव अनिल बेलकर म्हणाले, ‘‘अनेकदा नेटवर्कच्या समस्येमुळे कार्ड स्वाईप मशीन चालत नाही आणि बराच वेळ त्यात जातो. कार्ड स्वाइप मशीन मिळवण्यासाठी अनेक ठिकाणी ३-४ महिन्यांचे ‘वेटिंग’ आहे.’’

कार्ड स्वाइप करताना व्यावसायिकांना २ टक्के आकार पडत असल्याबद्दलही नाराजी असून औषध खरेदीपेक्षा ही नाराजी कमी मार्जिन असलेल्या टूथपेस्ट, क्रीम वगैरे प्रसाधनांच्या खरेदीबाबत आहे, असे औषधे व सौंदर्यप्रसाधनांचे घाऊक विक्रेते प्रसन्न पाटील यांनी सांगितले. ते म्हणाले, ‘‘किरकोळ विक्रेते आमच्याकडून खरेदी करताना चेक देतात. पण त्यांच्या बँक खात्यातच वेळेत पैसे जमा होऊ शकले नाहीत तर चेक वठत नाही. मोबाइल वॉलेटमध्ये येणारे पैसेही बँकेत तत्काळ जमा होत नसल्याचा अनुभव येतो आहे.’’

काही औषधविक्रेते मात्र आता परिस्थिती सुरळीत झाल्याचा अनुभव सांगतात. औषधविक्रेते जयेश कासट म्हणाले, ‘‘मी एक महिन्यापूर्वी कार्ड स्वाइप मशीनला अर्ज केला असून मला अद्याप ते मिळालेले नाही. पण सध्या छोटे ‘एम स्वाइप’ मशीन वापरतो. रोजचे निम्मे ग्राहक ‘कॅशलेस’ व्यवहार करतात. परंतु रोज १-२ ग्राहक चेक देखील देतात. दुकानात जास्त रोकड ठेवणे सुरक्षेच्या दृष्टीनेही सोईचे नसल्याने ‘कॅशलेस’चा पर्याय चांगला वाटतो.’’

मोटार सायकल दुरुस्तीच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे. डेबिट कार्ड किंवा धनादेशाद्वारे व्यवहार करतो. एका दृष्टीने चांगले झाले असले, तरी पैशांची उलाढाल कमीच आहे. कामगारांना पगार रोख द्यावे लागतात. रोख पगार देण्यासाठी पैसे नसतात. त्यामुळे कामगार कपात करावी लागली. ज्या कामगारांना धनादेश देतो, त्यांना दोन-दोन तास रांगेत उभे राहावे लागते

सचिन कदम, समर्थ मोटर्स