09 March 2021

News Flash

सोलापूरचा अभयसिंह मोहिते राज्यात प्रथम

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१४ च्या राज्यसेवा परीक्षेत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवीधर उमेदवारांनी ठसा उमटवला आहे.

| April 6, 2015 01:25 am

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या २०१४ च्या राज्यसेवा परीक्षेत अभियांत्रिकी आणि वैद्यकीय पदवीधर उमेदवारांनी ठसा उमटवला आहे. या वर्षी ग्रामीण भागातील उमेदवारांनी या परीक्षेत बाजी मारली असून सोलापूर येथील अभयसिंह मोहिते राज्यात सर्वप्रथम आला आहे. तर नांदेड येथील वनश्री लाभशेटवार (गुण ४२५) ही राज्यात मुलींमध्ये पहिली आली असून ती वैद्यकीय पदवीधर आहे.
राज्यसेवा परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला. या परीक्षेत सोलापूर जिल्ह्य़ातील कचरेवाडी-मंगळवेढे येथील अभयसिंह मोहिते ४७० गुण मिळवून राज्यात पहिला आला आहे. समाधान शेंडगे (गुण ४६६) हा विद्यार्थी दुसरा, तर प्रशांत खेडेकर (गुण ४६३) हा विद्यार्थी तिसरा आला आहे. पुण्यातील विशाल साकोरे (गुण ४६३) हा उमेदवार मागासवर्गीय गटात पहिला, तर एकुणात चौथा आला आहे. हे दोघेही उमेदवार अभियांत्रिकी शाखेचे पदवीधर आहेत.
उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, तहसीलदार अशा महत्त्वाच्या पदांसाठी ही परीक्षा झाली होती. ‘अ’ वर्गातील १२५ आणि ‘ब’ वर्गातील ३१३ अशा एकूण ४३८ पदांसाठी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी राज्यातून १ लाख ७६ हजार २२४ उमेदवारांनी नोंदणी केली होती. परीक्षेसाठी महत्त्वाची पदे असल्यामुळे आणि पदांची संख्या जास्त असल्यामुळे या वेळी उमेदवारांचा मोठा प्रतिसाद मिळाला होता. या वर्षी निवडल्या गेलेल्या ४३८ उमेदवारांपैकी १३६ उमेदवार हे अभियांत्रिकी शाखेतील पदवीधर आहेत, तर ८४ उमेदवार हे वैद्यकीय शाखेतील पदवीधर आहेत.

निकालाची वैशिष्टय़े
– अभियांत्रिकी, वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या उमेदवारांची मक्तेदारी
– ग्रामीण आणि निमशहरी भागांतील विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक
– मुलींचे प्रमाणे वाढले. मात्र, पहिल्या दहामध्ये मुली नाहीत
– गुणांचे कट ऑफ वाढले
– सर्व वर्गातील उमेदवारांचे गुण वाढले. गुणांमधील अंतरही कमी
– उत्तीर्ण होणाऱ्यांमध्ये नव्या उमेदवारांची संख्या वाढली. मात्र, वरच्या पदांवर अनुभव असलेल्या उमेदवारांचीच सरशी
– केंद्रीय लोकसेवा आयोगाची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे प्रमाण अधिक
पूर्वपरीक्षा द्यावीच लागली..
आयोगाची २०१५ ची राज्यसेवा पूर्वपरीक्षाही रविवारी होती. गेल्यावर्षी आयोगाने पूर्वपरीक्षेच्या आदल्या दिवशी निकाल जाहीर केला होता. या वर्षी मात्र, पूर्वपरीक्षा होण्यापूर्वी निकाल जाहीर करण्याचा मुहूर्त आयोगाला गाठता आला नाही. दुपारी अगदी पूर्वपरीक्षेच्या केंद्रांवरही परीक्षेपेक्षाही गेल्यावर्षीचा निकाल लागला का, याचीच उत्सुकता उमेदवारांमध्ये दिसत होती. निकालाच्या प्रतीक्षेतच अनेकांनी रविवारी पूर्वपरीक्षा दिली. मात्र, परीक्षा देऊन बाहेर आल्यावर निकाल जाहीर झाल्याचे कळले आणि उमेदवारांमध्ये उत्साह पसरला.
पूर्वपरीक्षेत भाषांतराच्या चुका..
आयोगाच्या २०१५ च्या राज्यसेवा पूर्वपरीक्षेत प्रश्नपत्रिकेत भाषांतराच्या चुका असल्याची तक्रार उमेदवारांनी केली आहे. सिसॅटच्या मराठी माध्यमाच्या प्रश्नपत्रिकेत अनेक प्रश्नांमध्ये नेमके काय म्हणायचे आहे, हे लक्षात येत नव्हते, असे उमेदवारांचे म्हणणे आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 6, 2015 1:25 am

Web Title: mpsc exam doctors enigeneers result
टॅग : Doctors,Exam,Mpsc 2,Result
Next Stories
1 शहर सुधारणा, महिला समिती मनसेला; क्रीडा व विधी समिती राष्ट्रवादीकडे
2 कामगाराला रुजू करून घेण्याच्या निर्णयाला टाटा मोटर्स औद्योगिक न्यायालयात आव्हान देणार
3 ऑनलाईन बँकिंगद्वारे दोन लाखांची फसवणूक
Just Now!
X