अरुंद रस्त्यांवरील वाहतूक समस्येवर नागपूर मेट्रोने बहुमजली (डबल डेकर) उड्डाणपूल तयार करून समस्येतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे. असाच पर्याय पुण्यातील अरुंद रस्त्यांवर करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. नागपूर मेट्रोला बहुमजली उड्डाण पुलांसाठी महापालिका आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने आर्थिक मदत केली आहे. पुण्यातील बहुमजली उड्डाण पुलांसाठी महापालिका, महामार्ग प्राधिकरण या संस्थांनी आर्थिक मदत केली, तर अरुंद रस्त्यांवरील वाहतूक समस्येबाबत मार्ग निघू शकतो, असे मत मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केले.

पुणे आणि नागपूर मेट्रोचे काम प्रगतिपथावर आहे. या पाश्र्वभूमीवर नागपूर मेट्रो रेल्वेच्या कामाची पाहणी करण्यासाठी महामेट्रोकडून प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींसाठी नागपूर दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. नागपूर मेट्रो रेल्वेकडून पहिल्या टप्प्यात अंजनी ते विमानतळ या मार्गावर साडेतीन किलोमीटरवर लांबीचा तीन मजली उड्डाण पूल तयार केला जात आहे. या बहुमजली उड्डाण पुलावर सेवा रस्ता, राष्ट्रीय महामार्ग आणि तिसऱ्या मजल्यावरून मेट्रो धावणार आहे. तसेच एलआयसी चौक ते अ‍ॅटोमोटिव्ह स्थानकादरम्यान साडेपाच किलोमीटर लांबीचा चार मजली उड्डाण पूल तयार करण्यात येत आहे.

या चार मजली उड्डाण पुलावर एका मजल्यावर सेवा रस्ता, एका मजल्यावर रेल्वे, तिसऱ्या मजल्यावर राष्ट्रीय महामार्ग आणि चौथ्या मजल्यावर मेट्रो असे नियोजन आहे. या बहुमजली उड्डाण पुलामुळे जागेची आणि पैशांची बचत होऊन वाहतूक सुरळीत होणार आहे.

पुण्यात पहिल्या टप्प्यात स्वारगेट ते पिंपरी आणि वनाझ ते रामवाडी या मार्गावर महामेट्रोचे काम सुरू आहे. शिवाजीनगर ते पिंपरीपर्यंत जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर वाहतुकीसाठी जागा मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. मेट्रोचा मार्ग तयार झाला, तरी या मार्गावर वाहतुकीला कोणताही अडथळा येणार नाही. मात्र, वनाझ ते रामवाडी या मार्गावर काही ठिकाणी बहुमजली उड्डाण पुलाची गरज आहे. तर पिंपरी ते स्वारगेट या मार्गावर शिवाजीनगर ते नदीपर्यंत बहुमजली उड्डाण पूल बांधला, तर भविष्यातील वाहतुकीचा प्रश्न सुटू शकतो. पुणे महापालिकेने कोथरूड येथे सहाशे मीटर लांबीचा बहुमजली उड्डाण पूल बांधण्याची विनंती केली आहे. त्यांच्या विनंतप्रमाणे त्या ठिकाणी सहाशे मीटर लांबीचा बहुमजली उड्डाण पूल तयार करण्यात येणार आहे. मेट्रोच्या दोन्ही मार्गावर ज्या ठिकाणी बहुमजली उड्डाण पुलाची गरज आहे, त्या ठिकाणी पुणे महापालिकेने विनंती केली, तर बहुमजली उड्डाण पूल बांधण्यात येतील. मात्र, त्यासाठी राज्य सरकार आणि महापालिकेची आर्थिक मदत अपेक्षित असल्याचे डॉ. दीक्षित म्हणाले.