संजय बारू यांचे निरीक्षण

सत्तेमध्ये आल्यानंतर लगेच भरीव कामगिरी केली तर जनतेच्या चिरकाल स्मरणात राहते ही पी. व्ही. नरसिंह राव यांची शिकवण आत्मसात करीत अटलबिहारी वाजपेयी यांनी अणुचाचण्या केल्या. मात्र, ही शिकवण नरेंद्र मोदी यांना समजली नाही. आपल्या पंतप्रधानपदाच्या सुरुवातीच्या काळात मोदी यांनी कोणतीही भरीव कामगिरी केली नाही, असे निरीक्षण ज्येष्ठ पत्रकार-लेखक आणि राजकीय विश्लेषक डॉ. संजय बारू यांनी मंगळवारी नोंदविले.

पुणे इंटरनॅशनल सेंटरतर्फे ‘१९९१- हाऊ पी व्ही नरसिंह राव मेड हिस्ट्री’ या पुस्तकाचे लेखक डॉ. संजय बारू यांच्याशी ज्येष्ठ संपादक डॉ. दिलीप पाडगावकर यांनी संवाद साधला. या पुस्तकाचे प्रकाशनही या वेळी करण्यात आले.

बारू म्हणाले, आपल्या पंतप्रधानपदाच्या काळात पी. व्ही. नरसिंह राव यांनी अनेक महत्त्वाची दूरगामी परिणाम करणारे निर्णय घेतले होते. असे कायमस्वरूपी लक्षात राहणारे योगदान देणाऱ्या पंतप्रधानाला काँग्रेससह सर्व जण विसरले होते. हे योगदान विस्मृतीत जाऊ नये, यासाठी मी त्यांच्यावर पुस्तक लिहिले. पंतप्रधान झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात राव यांनी आपल्या कार्याची दिशा स्पष्ट केली होती. परराष्ट्रमंत्री म्हणून काम केलेल्या राव यांना जागतिक परिस्थितीचे ज्ञान होते. आíथक सुधारणांचा निर्णय त्यांनी जागतिक दबावाखाली येऊन नव्हे तर जगाच्या आकलनातून आणि तत्कालीन वित्तीय परिस्थितीविषयी असलेल्या भानातून घेतला. बाबरी मशीद पाडण्यात आली, त्या वेळी उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करणे शक्य नव्हते. राज्य सरकारवर विश्वास ठेवल्यामुळे नरसिंह राव या कटात सामील होते, असे म्हणणे चुकीचे आहे.

ममताच काँग्रेसच्या तारहणार

काँग्रेसचे भवितव्य काय असेल, या प्रश्नाबाबत डॉ. बारू म्हणाले, सध्याच्या कॉँग्रेसमध्ये भविष्यात पंतप्रधान बनेल, असा एकही नेता मला दिसत नाही. काँग्रेसला खरेच पुन्हा उभारी घ्यायची असेल, तर सोनिया गांधी यांनी सर्व माजी काँग्रेसजनांना मूळ पक्षात एकत्र आणावे आणि त्यानंतर ममता बॅनर्जी यांनी पक्षाचे नेतृत्व करावे. सध्या देशात मूळ काँग्रेसवासी असलेल्या ममता याच एकमेव लोकनेत्या आहेत.