केंद्रातील निष्क्रिय आणि अकार्यक्षम सरकारपासून देशाला मुक्त करण्यासाठी भारतीय जनता पक्षातर्फे रविवारी (१४ जुलै) निर्धार सभेचे आयोजन करण्यात आले असून गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांची या सभेत मुख्य उपस्थिती असेल, अशी माहिती पक्षाचे शहराध्यक्ष अनिल शिरोळे यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी पक्षाने सुरू केली असून देशाच्या विकासात अडथळा ठरणाऱ्या काँग्रेसपासून देशाला मुक्त करण्याचा निर्धार भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे. त्यासाठीच या सभेचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. बी. जे. मेडिकल कॉलेजच्या मैदानावर रविवारी दुपारी अडीच वाजता ही सभा होणार आहे. सभेसाठी मैदानावर भव्य मंडप उभारला जाणार असून त्याच्या कामाला प्रारंभ झाला आहे.
सभेत पक्षाचे नेते गोपीनाथ मुंडे, खासदार प्रकाश जावडेकर, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, तसेच एकनाथ खडसे, विनोद तावडे यांचीही उपस्थिती असेल. या नेत्यांची भाषणेही सभेत होणार असल्याची माहिती शिरोळे यांनी दिली. सभेच्या तयारीसाठी खासदार जावडेकर, आमदार गिरीश बापट, माधुरी मिसाळ, भीमराव तापकीर, योगेश गोगावले, प्रा. मेधा कुलकर्णी, अशोक येनपुरे आणि दिलीप कांबळे यांची संयोजन समिती नियुक्त करण्यात आली आहे.