पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना एका पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोमवारी तीव्र आंदोलन करण्यात आले. भारतीय जनता पक्षाच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रसचे शहराध्यक्ष, आमदार चेतन तुपे आणि खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली लाल महाल येथे हे आंदोलन करण्यात आले.

आज के शिवाजी : नरेंद्र मोदी या पुस्तकात मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर करण्यात आली आहे. त्याचे तीव्र पडसाद राज्यभरात उमटत असतानाच पुण्यातही राष्ट्रवादी काँग्रेसकडून तीव्र निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर कोणाची तुलना करण्यापेक्षा महाराजांनी सर्व जाती धर्मातील लोकांना बरोबर घेऊन जे स्वराज्य निर्माण केले त्याचे अनुकरण भारतीय जनता पक्षाने करावे, असे यावेळी खासदार अ‍ॅड. वंदना चव्हाण यांनी सांगितले.

चेतन तुपे म्हणाले की, राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीदिनी असे पुस्तक प्रकाशित करणे हे भाजपचे एक कटकारस्थान आहे. यापूर्वीही विकृत मनोवृत्तीच्या लोकांनी अशी कृत्ये केली आहेत. मराठा वीरांची आणि मराठी मातीच्या थोर पराक्रमाचा पुस्तकाच्या लेखकाने अपमान केला आहे. विकृत लोकांमुळे शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या पुस्तकावर त्वरित बंदी आणावी आणि या षड्यंत्रामागे जे कोणी आहेत त्यांच्यावर कारवाई करावी.

पक्षाचे महापालिकेतील विरोधी पक्षनेता दिलीप बराटे, युवक कार्याध्यक्ष रविकांत वरपे, नगरसेवक सुभाष जगताप, प्रशांत जगताप, बाळासाहेब बोडके, युवक अध्यक्ष राकेश कामठे, प्रदीप देशमुख यांच्यासह पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी-कार्यकर्ते मोठय़ा संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

मोदींवरील पुस्तकाचा विद्यार्थ्यांकडून निषेध

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबरोबर करणाऱ्या पुस्तकाविरोधात पुण्यातही पडसाद उमटले. या पुस्तकाविरोधात फग्र्युसन महाविद्यालयातील काही विद्यार्थ्यांनी सोमवारी निदर्शने केली.

जय भगवान गोयल यांनी लिहिलेल्या ‘आज के शिवाजी : नरेंद्र मोदी’ या पुस्तकाचे रविवारी दिल्लीत प्रकाशन झाल्यानंतर गदारोळ सुरू झाला आहे. या पुस्तकावर समाजमाध्यमातून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. तर राजकीय पक्षांकडून भाजपला कोंडीत पकडण्यात आले आहे. या पाश्र्वभूमीवर, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकडूनही या पुस्तकाचा निषेध करण्यात आला आहे.

फग्र्युसन महाविद्यालयातील काही पुरोगामी विचारांच्या विद्यार्थ्यांनी एकत्र येत सोमवारी महाविद्यालयाच्या आवारात निदर्शने केली. या पुस्तकावर बंदी आणून त्याची विक्री रोखण्याची मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात आली. तसेच भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. या निदर्शनांमुळे महाविद्यालयातील वातावरण बिघडू नये यासाठी पोलिसही दाखल झाले होते.