करोनाच्या निदानासाठी चाचण्या करताना लक्षणे असलेले रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांना प्राधान्य देणे आवश्यक आहे. त्याव्यतिरिक्त प्रवास, प्रमाणपत्र किंवा ‘एक्झिट टेस्ट’ अशा कारणांसाठी होणाऱ्या चाचण्यांची वाढती संख्या लक्षात घेता, चाचण्यांबाबतच्या धोरणात बदल केला पाहिजे, असे राज्याचे करोनाविषयक तांत्रिक सल्लागार आणि निवृत्त आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे यांनी म्हटले आहे.

राज्यात दिवसात लाखभर करोना निदान चाचण्या केल्या जातात. विमान प्रवास किंवा जिल्ह््याबाहेरील प्रवासासाठी सध्या करोनाची आरटीपीसीआर चाचणी करून संसर्ग नसल्याचे प्रमाणपत्र सादर करणे अनिवार्य आहे. त्यामुळे वैद्यकीय कारणाव्यतिरिक्तही चाचण्या केल्या जातात. संसर्ग झालेले रुग्णही ठरावीक अंतराने मोठ्या प्रमाणात ‘एक्झिट टेस्ट’ करतात. या चाचण्यांची संख्याही दैनंदिन चाचण्यांच्या संख्येत भर घालते. मात्र लक्षणे असलेल्या रुग्णांच्या आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींच्या किती चाचण्या झाल्या याची नोंद आरोग्य विभागाकडेच नाही.

डॉ. साळुंखे यांनी सांगितले की, कोणत्या कारणांसाठी चाचण्या केल्या जातात, याचे वर्गीकरण आपल्याकडे नाही, मात्र ते असते तर चाचण्यांच्या क्षमतांचा पूर्ण वापर लक्षणे असलेले नागरिक, बाधित आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांच्यासाठी करणे शक्य झाले असते.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या राज्य शाखेचे माजी अध्यक्ष डॉ. अविनाश भोंडवे म्हणाले की, करोना चाचणीत संसर्ग आढळल्यानंतर पुन्हा ‘एक्झिट टेस्ट’ करणे अपेक्षित नाही, तशी सूचनाही आरोग्य विभागाने मागील वर्षी दिली होती. तरी अनेक नागरिक दर काही दिवसांच्या अंतराने चाचणी करून बघतात. प्रवास, प्रमाणपत्र अशा अनेक कारणांसाठी नियमितपणे करोना चाचणी करणारे नागरिक आहेत. खरे तर लक्षणे असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्ती यांच्या किती चाचण्या झाल्या याचे तरी किमान वर्गीकरण असणे अपेक्षित होते.

‘वर्गीकरणाने फरक पडत नाही!’

राज्याचे साथरोग सर्वेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी सांगितले की, एखादा नागरिक कोणत्या कारणासाठी चाचणी करत आहे, त्याची माहिती घेऊन वर्गीकरण के ले जात नाही. मात्र वैद्यकीय कारणाव्यतिरिक्त केलेल्या चाचणीत ज्या व्यक्ती बाधित आढळतात त्यांच्यासाठीही विलगीकरण, उपचार हा मार्ग अवलंबला जातो, त्यामुळे वर्गीकरण आहे किंवा नाही, याने कोणताही फरक पडत नाही.

समूह संसर्गाचा टप्पा केव्हाच ओलांडल्यामुळे संसर्गाची लक्षणे असलेल्या व्यक्ती आणि त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्ती यांच्या चाचण्या हेच आपल्या चाचण्यांच्या केंद्रस्थानी असण्याची गरज आहे. त्यादृष्टीने सध्याचे धोरण काहीसे बदलण्याची गरज आहे.

– डॉ. सुभाष साळुंखे