नवे रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणही स्थिर

पुणे : नव्याने आढळून येणाऱ्या करोनाबाधित रुग्णांची संख्या स्थिर राहात असल्यामुळे शहरात करोना संसर्गाची दुसरी लाट येण्याची शक्यता कमीच आहे. दुसरी लाट आली तरी तिची तीव्रता सौम्य असेल, असा अंदाज महापालिकेच्या आरोग्य विभागाकडून वर्तविण्यात आला आहे. मात्र दुसरी लाट येईल, ही शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने प्रतिबंधित उपाययोजना करण्यावर लक्ष के ंद्रित के ले आहे.

शहरात जानेवारी महिन्यात करोना संसर्गाची दुसरी लाट येईल, अशी शक्यता केंद्रीय पथकाने वर्तविली आहे. शहरातील करोना संसर्ग आणि नव्याने आढळून येणाऱ्या रुग्णांचे प्रमाण नियंत्रणात असल्याचे दिसून येत असतानाच दिवाळीमध्ये शहरात गर्दी उसळली होती.  दिवाळीवेळी झालेली गर्दी लक्षात घेऊन दुसरी लाट मोठ्या तीव्रतेची असेल, असा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून वर्तविण्यात येत होता.

दिवाळीनंतर शहरातील रुग्णसंख्या काही प्रमाणात वाढली असली तरी ही रुग्णसंख्या स्थिर राहिली आहे. त्यामुळेच दुसऱ्या लाटेची शक्यता खूपच कमी असेल, असा अंदाज महापालिके च्या आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

‘शहरात प्रतीदिन ३५० ते ४५० रुग्ण आढळून येत आहेत. नव्याने रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण स्थिर राहिल्याचे निदर्शनास आले आहे. तसेच सक्रिय बाधित रुग्णांच्या संख्येतही लक्षणीय वाढ  झालेली नाही. त्यामुळे दुसरी लाट येण्याची शक्यता तूर्त कमीच आहे. किं बहुना लाट आली तरी लाटेची तीव्रता खूप सौम्य असेल. दुसरी लाट येईल की नाही हे १५ ते २० डिसेंबर या कालावधीतील रुग्णसंख्या पाहूनच अंदाज वर्तविण्यात येईल. तूर्तास मात्र तशी शक्यता खूपच कमी आहे,’ अशी माहिती आरोग्य प्रमुख डॉ. आशिष भारती यांनी दिली. मात्र दुसरी लाट येईलच हे गृहीत धरूनच प्रतिबंधात्मक उपाययोजना महापालिके कडून सुरू करण्यात आल्या आहेत. नागरिकांनीही निष्काळजीपणा टाळून मुखपट्टीचा वापर करावा, सुरक्षित अंतराच्या निकषाचे पालन करावे, असे आवाहन महापालिके च्या आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

नव्याने आढळणाऱ्या रुग्णांची संख्या स्थिर आहे. त्यामुळे सध्या तरी दुसरी लाट येईल, असे वाटत नाही. मात्र त्याबाबतची नेमकी परिस्थिती २० डिसेंबर नंतरच स्पष्ट होईल.

– डॉ. आशिष भारती, आरोग्य प्रमुख, महापालिका