सत्तेत नसलेल्या आणि घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मला कोणत्याही फंदात पडायचे नाही,’ असे उद्गार िपपरीत शुक्रवारी काढले. प्रसारमाध्यमांकडून एकच बातमी सतत दाखवली जाते, दुसरी बाजू समजून घेतली जात नाही, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.
पिंपरीतील एका कार्यक्रमानंतर अजितदादा पत्रकारांशी बोलत होते. एकात्मिक राज्य जलआराखडा अस्तित्वात नसतानाही मंजूर केलेल्या १८९ प्रकल्पांच्या चौकशीसाठी राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशानुसार समिती स्थापन केल्याने तत्कालीन जलसंपदामंत्री अजितदादा व सुनील तटकरे अडचणीत आले आहेत. या संदर्भात, पत्रकारांनी प्रतिक्रियेसाठी वारंवार विचारणा केल्यानंतर अजितदादा म्हणाले, ‘‘ही न्यायप्रवीष्ट बाब असल्याने त्यावर मी बोलणार नाही. मी काहीतरी वक्तव्य करणार, तुम्ही दिवसभर बातमी चालवणार. सध्या मला कोणत्याही फंदात पडायचे नाही. चौकशी समितीचे मी स्वागत करतो. त्यांनी सर्व मुद्दे तपासावेत, माहिती घ्यावी. कामात भ्रष्टाचार झाला असल्यास पारदर्शक कार्यवाही व्हावी. अलीकडे मी काही बोलत नाही. प्रसारमाध्यमांकडून दुसरी बाजू समजून घेतली जात नाही. एकही प्रकल्प पश्चिम महाराष्ट्रातील नाही. एखादा अपवाद वगळता सर्वच प्रकल्प विदर्भ आणि मराठवाडय़ातील आहेत.’’
समाजकल्याणमंत्री दिलीप कांबळे यांना माझ्याविषयी काहीही बोलू द्या, आरोप करणाऱ्यांना करू द्या, त्याविषयी काहीही बोलणार नाही. चौकशी झाल्यानंतर सर्व चित्र स्पष्ट होईल. जनता सोबत आहे. निवडणुकीत भूमिका स्पष्ट करू, सभागृहात म्हणणे मांडू, असेही पवार यांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Feb 2016 रोजी प्रकाशित
मला कोणत्याही फंदात पडायचे नाही- अजित पवार
घोटाळ्यांच्या आरोपांमुळे अडचणीत सापडलेल्या माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘मला कोणत्याही फंदात पडायचे नाही,’ असे उद्गार िपपरीत शुक्रवारी काढले.
Written by लोकसत्ता टीम

First published on: 13-02-2016 at 03:35 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: No reaction ajit pawar