राजू शेट्टी आणि माझ्यात वैयक्तिक काही वाद नव्हते तर तात्विक वाद होते. तसेच माझा आणि त्यांचा विधानसभा मतदारसंघही वेगळा असल्याने त्यांच्या विरोधात निवडणूक लढवण्याचा प्रश्नच येत नाही. शेट्टी आज जरी खासदार नसले तरी त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत, अशा शब्दांत रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी आपल्या जुन्या सहकाऱ्याबाबत भावना व्यक्त केल्या.

कृषी राज्यमंत्री आणि रयत क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सदाभाऊ खोत यांच्या अध्यक्षतेखाली राज्य कार्यकारिणी बैठक आज पुण्यात पार पडली. या बैठकीत दहा ठराव करण्यात आले. दरम्यान खोत यांनी पत्रकारांशी संवाद साधला, यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भुमिका स्पष्ट केली.

सदाभाऊ म्हणाले, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रयत क्रांती संघटनेकडून तयारी सुरु करण्यात आली आहे. आज झालेल्या संघटनेच्या कार्यकारिणीच्या बैठकीत अनेक मतदारसंघातून मी निवडणूक लढवावी, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. मात्र, मुख्यमंत्री सांगतील त्या मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास मी तयार आहे.

 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर रयत क्रांती संघटनेचे पदाधिकारी महिनाभर राज्यात विविध ठिकाणी जाऊन निवडणूक लढवण्याबाबत आढावा घेतील त्यानंतर एक अधिवेशन घेऊन संघटनेचा उमेदवार देण्याबाबत निर्णय घेतला जाईल. तसेच आम्ही महायुतीसोबत असल्याने जागा वाटपाबाबत मुख्यमंत्री फडणवीसांच्या सोबतही चर्चा केली जाईल, असेही सदाभाऊ खोत यावेळी म्हणाले.