नागरिक आणि कर्मचाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक सुरूच

नोटा बदलून देणे आणि खात्यात पैसे भरून घेणे या दोनच प्रक्रिया बँकेच्या कामकाजामध्ये सुरू आहेत. बँकांमध्ये नोटा बदलून घेण्यासाठी चालणाऱ्या ग्राहकांच्या त्राग्याबरोबरच इतर सर्व व्यवहार थंडावल्याचाही फटका ग्राहकांना बसला आहे.

पाचशे आणि हजाराच्या नोटा बंद करण्याच्या घोषणेनंतर दुसऱ्या दिवशीपासून बँकांच्या बाहेर लागलेल्या रांगा आता नागरिकांच्या नजरेलाही सवयीच्या झालेल्या आहेत. रांगेमध्ये तासन्तास ताटकळण्यामुळे त्रागाही केला जात आहे. त्याचबरोबर बँकांनी नोटा बदलणे आणि पैसे भरून घेणे याशिवायचे बाकी बहुतेक व्यवहार जवळपास बंदच केल्यामुळेही नागरिक त्रस्त झालेआहेत.

पैसे काढणे, पैसे भरणे आणि आता नव्यानेच भर पडलेले काम म्हणजे नोटा बदलणे याशिवाय पासबुकात नोंदी करणे, एटीएमकार्डसाठीचे अर्ज, नवे खाते उघडणे, धनादेश जमा करणे, डीडी काढणे, गहाळ झालेली कागदपत्रे मिळवणे अशी कामे घेऊन ग्राहकांची रोज बँकेत गर्दी होत असते. मात्र सध्या रोखीचे व्यवहार वगळता बँकेतील बहुतेक सर्व कामे ठप्प झाली आहेत. बँकामधील मनुष्यबळ हे गर्दीचे नियोजन आणि पैसे गोळा करणे यातच गुंतले आहे. नोटा बदलून घेण्यासाठी अनेक बँकांनी स्वतंत्र खिडक्या सुरू केल्या आहेत. त्यासाठी इतर सर्व नेहमीच्या कामकाजासाठी असलेले मनुष्यबळच वापरावे लागत आहे. त्यातच आता नागरिकांच्या बोटाची शाई तपासणे आणि शाई लावणे याचीही भर पडली आहे.

त्यामुळे रोखीच्या व्यवहारांपलिकडे अगदी धनादेश स्वीकारण्यासाठी, डीडी काढण्यासाठीही बँकांकडून नकार देण्यात येत आहे. धनादेश ‘ड्रॉप बॉक्स’ मध्ये टाकण्याची सूचना देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पासबुकऐवजी ऑनलाइन स्टेटमेंट घ्या, एटीएम कार्डसाठी कॉल सेंटरशी संपर्क साधा अशी उत्तरे कर्मचाऱ्यांकडून मिळत असल्यामुळे नागरिकांच्या त्रासात भर पडली आहे. ‘पासबुकावर नोंद करून घेण्यासाठी नागरिकांकडून सर्वाधिक विचारणा होत असते. मात्र पासबुक भरून देण्यासाठीही स्वतंत्र माणूस बसवावा लागतो. गर्दी असल्यास ते शक्य होत नाही. निवृत्त कर्मचारी, अधिकारी मदत करीत आहेत.

स्वाइप मशिन्सबाबत चौकशी वाढली

रोखीच्या व्यवहारावर पुरेसे चलनच नसल्यामुळे मर्यादा आल्यानंतर आता दुकानदार, छोटे व्यावसायिक यांच्याकडून स्वाइप मशिन्सबाबत विचारणा वाढली आहे. ज्या बँकेत खाते असते, त्या बँकेत कार्ड स्वाइप करण्याचे यंत्र मिळण्यासाठी अर्ज करावा लागतो. ‘अगदी छोटे दुकानदार, टेलर, ब्युटी पार्लर्स यांच्याकडूनही स्वाइप मशिन मिळण्यासाठी विचारणा करण्यात येत आहे, असे एचडीएफसी बँकेतील कर्मचाऱ्यांनी सांगितले.