पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना अन्नदान करण्याआधी संबंधित व्यक्तींनी वा संस्थांनी नियमानुसार अन्न व औषध प्रशासनाकडे (एफडीए) नोंदणी करावी, असे आवाहन अन्न विभागाचे सहआयुक्त शशिकांत केकरे यांनी केले आहे. ही नोंदणी ऑनलाईन करता येणार आहे.
२० जूनपासून संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम यांच्या पालखी सोहळ्यास प्रारंभ होणार आहे. पालखीच्या मार्गावर अनेक संस्थांतर्फे वारकऱ्यांना अन्न पदार्थाचे वाटप केले जाते. हे अन्न पदार्थ आरोग्यास सुरक्षित असावेत यासाठी वाटपकर्त्यांनी एफडीएकडे रीतसर नोंदणी करून नियमांचे पालन करावे, असे विभागाने कळवले आहे.  foodlicensing.fssai.gov.in या संकेतस्थळावर अर्ज करून आणि शासकीय नोंदणी शुल्क भरून ही नोंदणी करता येणार आहे.
 
पालखी मार्गावरील अन्न व्यावसायिकांची तपासणी होणार

पालखीच्या मार्गावर खाद्य पदार्थाची विक्री करणाऱ्या विविध अन्न व्यावसायिकांची तपासणी करण्यासाठी एफडीएतर्फे तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. यात हॉटेल, रेस्टॉरंट, मिठाई दुकाने, रसवंती गृहे, चहाच्या टपऱ्या तसेच हातगाडय़ांवरील अन्न पदार्थाचीही तपासणी होईल. विक्रीस ठेवण्यात येणारे अन्न पदार्थ रोजचे रोज तयार केलेले, आरोग्यास सुरक्षित असावेत तसेच ते झाकून ठेवलेले असावेत अशा सूचना एफडीएने दिल्या आहेत.