पेशव्यांसह सरदारांच्या वंशजांचे मत

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांनी सर्व लढाया जिंकून साम्राज्याचा विस्तार केला. त्यांची रणनीती आणि मुत्सद्देगिरीचा इतिहास अद्याप पूर्ण प्रकाशात आलेला नाही. त्यामुळे पेशव्याच्या इतिहासाची सर्व पाने उलगडण्याची आवश्यकता असून पेशव्यांचा प्रेरणादायी इतिहास अभ्यासला जावा, असे मत पेशव्यांसह त्यांच्या काळातील सरदारांच्या वंशजांनी व्यक्त केले.

थोरले बाजीराव पेशवे प्रतिष्ठानतर्फे थोरले बाजीराव पेशवे यांच्या २७९ व्या पुण्यतिथिनिमित्त त्यांच्या शनिवारवाडय़ासमोरील अश्वारुढ पुतळ्याला पुष्पचक्र  अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष एअर मार्शल (निवृत्त) भूषण गोखले, सचिव कुंदनकुमार साठे, चिंतामणी क्षीरसागर, माधव गांगल या वेळी उपस्थित होते. पेशव्यांचे वंशज उदयसिंह पेशवा, सरदार मुजुमदार यांचे वंशज प्रतापराव मुजुमदार, पिलाजी जाधवराव यांचे वंशज रामराजे जाधवराव, अंबाजी पुरंदरे यांचे वंशज जय पुरंदरे , अनंतराव रास्ते यांचे वंशज अशोक रास्ते, दिलीप पानसे, शरद हसबनीस, बाळकृष्ण रेठरेकर यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

उदयसिंह पेशवा म्हणाले, पेशव्यांच्या सरदारांचे सर्व वंशज हे आजही आमचे आप्त आहेत. आम्हा सर्वाना पेशव्यांच्या इतिहासाचा अभिमान आहे. तो प्रेरणादायी इतिहास अभ्यासावा असाच आहे

गोखले म्हणाले, थोरले बाजीराव पेशवे हे एक अजिंक्य सेनानी होते. त्यांच्या शौयार्तून अनेकांनी प्रेरणा घेतली आहे. हा इतिहास सर्वांपुढे आला पाहिजे. त्यांची रणांगणावरील नीती, राजकीय मुत्सद्देगिरी यांची माहिती नव्या पिढीपर्यंत पोहचली पाहिजे यासाठी आमचा प्रयत्न आहे.