सलग आठवडय़ाच्या दरवाढीनंतर दरांचा नव्वा उच्चांक

पुणे : सलग आठवडय़ाच्या दरवाढीमुळे पुण्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांचा नवा उच्चांक झाला असन, पेट्रोलचे दर वेगाने शंभरीकडे चालले आहेत. बुधवारच्या (१२ मे) नव्या दरवाढीनंतर पुण्यात पेट्रोल ९८.०६ रुपये, डिझेल ८८.०८ रुपये लिटर झाले आहे. पॉवर पेट्रोलचे दर यापूर्वीच १०० रुपयांपुढे गेले असून, नव्या दरवाढीनंतर हे दर प्रतिलिटर १०१.७४ रुपयांवर पोहोचले आहेत. आठवडय़ाच्या कालावधीत साध्या पेट्रोलच्या दरात १.६१ रुपये, तर डिझेलच्या दरामध्ये १.९७ रुपये वाढ झाली आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये या वर्षांच्या सुरुवातीपासूनच मोठय़ा प्रमाणावर वाढ सुरू झाली होती. या कालावधीत अनेक ठिकाणी पेट्रोलचे दर लिटरमागे शंभर रुपयांच्या आसपास पोहोचले. त्याचप्रमाणे डिझेलच्या दरांतही अभूतपूर्व वाढ झाली होती. फेब्रुवारीच्या अखेरीस २७ तारखेला पुणे शहरात पेट्रोलचा दर ९७.१९ रुपये, तर डिझेलचा दर ८६.८८ रुपये प्रतिलिटर होता. शहरात पॉवर पेट्रोल त्यापूर्वीच १०० रुपयांपार गेले होते. मार्चमध्ये करोनाच्या दुसऱ्या लाटेत रुग्णांची संख्या वाढू लागल्याने सुरुवातीला पुण्यासह काही शहरांत, तर नंतर राज्यभर निर्बंध लागू करण्यात आले. या काळात इंधनाचे दर काही पैशांनी कमी झाले. त्यानुसार २४ मार्चला पेट्रोल ९७.०२ रुपये, तर डिझेल ८६.७० रुपये झाले होते. एप्रिलमध्येही काही पैशांनी दर खाली आले. १५ एप्रिलला पुण्यात पेट्रोलचा प्रतिलिटर दर ९६.४५ रुपये, तर डिझेलचा दर प्रतिलिटर ८६.११ रुपयांपर्यंत खाली आला होता.

सुमारे तीन आठवडे दरात कोणताही बदल न होता ते स्थिर राहिले होते. ४ मेपासून त्यात पुन्हा काही पैशांनी वाढ होण्यास सुरुवात झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढत असल्याने इंधनाच्या दरात वाढ होत असल्याचे म्हणणे ऑल इंडिया पेट्रोल डिलर असोसिएशनकडून मांडण्यात येत आहे. मात्र, देशात पश्चिम बंगालसह इतर राज्यांत निवडणुका असल्याने या काळात इंधनाची दरवाढ झाली नाही. मात्र, निकाल लागताच दरवाढ सुरू झाल्याचा आरोपही करण्यात येत आहे. सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनीही याबाबत शंका व्यक्त केली असून, सध्या पेट्रोलियम कंपन्या मोठय़ा प्रमाणावर नफा मिळवित असल्याचेही त्यांनी निदर्शनास आणून दिले आहे.

आठवडय़ातील दरवाढ (प्रतिलिटर)

दिनांक  पेट्रोल   डिझेल

४ मे     ९६.६२   ८६.५०

६ मे     ९७.०४  ८६.८५

७ मे     ९७.३१    ८७.१७

१० मे    ९७.५६   ८७.५१

१२ मे   ९८.०६   ८८.०८