पिंपरी-चिंचवडमध्ये केंद्र सरकारने शेतकरी आणि कामगार कायद्यात केलेल्या बदलाच्या विरोधात मानवी साखळी करून गुरुवारी आंदोलन करण्यात आले. मात्र, या आंदोलकांविरोधात जमावबंदी आणि संचार बंदीचे कारण पुढे करत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, करोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात जमावबंदी आणि संचारबंदी लागू आहे. त्यामुळे एकत्रित येण्यास नागरिकांना मज्जाव आहे. मात्र, गुरुवारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा चौकात पिंपरी चिंचवड औद्योगिक परिसरातील सर्व संघटीत, असंघटीत कामगार संघटनाच्यावतीने केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी शेकडोच्या संख्येने कामागारांनी केंद्र सरकारच्या विरोधात निषेधाच्या घोषणा देत फलक फडकवले आणि मानवी साखळी केली होती. केंद्रसरकारने शेतकरी आणि कामगार कायद्यात बदल केल्यावरून हे आंदोलन करण्यात आले होते. आंदोलनकर्ते एकत्र जमून आल्याने आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कैलास महादेव कदम, मारुती भापकर, संदीप भेगडे, इरफान सय्यद, केशव घोळवे, किशोर ढोकळे, दिलीप पवार, अनिल माधवराव रोहम, अजित अभ्यंकर यांच्यासह इतर जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कर्मचारी मिनाक्षी प्रभू राळे यांनी फिर्याद दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on November 27, 2020 3:53 pm