शहरात सर्वत्र डेंग्यूचा प्रादुर्भाव मोठय़ा प्रमाणावर झाला असून तो रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे गरजेचे असतानाही प्रशासनाकडून ठोस उपाययोजना होताना दिसत नाही, अशी तक्रार करत सर्वपक्षीय नगरसेवकांनी सोमवारी महापालिका प्रशासनाला फैलावर घेतले. संतप्त नगरसेवकांनी या वेळी प्रशासनावर जोरदार टीका केली. डेंग्यू उपाययोजनांबाबत हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई करा, असा आदेश महापौर दत्ता धनकवडे यांनी दिला.
सर्वसाधारण सभा सुरू होताच डेंग्यूचा मुद्दा उपस्थित करत नगरसेवकांनी भाषणे सुरू केली. विरोधी पक्षनेता अरविंद शिंदे यांनी या चर्चेला सुरुवात केली. डेंग्यूबाबत काय उपाययोजना केली त्याची माहिती द्या, अशी मागणी त्यांनी सभेत केली. डेंग्यूच्या डासांची पैदास जेथे होते तेथे प्रभावी उपाय करण्यात प्रशासन कमी पडत असून त्याला प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत आहे, असा आरोप गटनेता डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी केला. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रभावी उपाय करणे आवश्यक असताना तसे उपाय न करता प्रशासनाकडून केवळ मलमपट्टीच सुरू आहे, अशी तक्रार भारतीय जनता पक्षाचे गटनेता गणेश बीडकर यांनी केली. भाजपच्या मुक्ता टिळक, वर्षां तापकीर, मनीषा चोरबेले यांनीही अनेक मुद्दे मांडत प्रशासनावर टीका केली. शिवसेनेचे गटनेता अशोक हरणावळ तसेच सोनम झेंडे, मनसेचे राजाभाऊ लायगुडे, अस्मिता शिंदे, संगीता तिकोने, पुष्पा कनोजिया, राष्ट्रवादीचे प्रशांत जगताप, अनिल टिंगरे यांनीही डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ठोस उपाय करा, अशी मागणी केली. सदस्यांच्या भाषणानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी खुलासा करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्या खुलाशाने सदस्यांचे समाधान झाले नाही.
प्रशासनाच्या कारभारावर महापौर दत्ता धनकवडे यांनीही नाराजी व्यक्त केली. डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी बैठक घेण्यात आली होती. त्या बैठकीत ठोस कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र प्रशासनाने समाधानकारक काम केले नाही. नागरिकांनी योग्य सेवा मिळण्याची कार्यवाही करा आणि जे हलगर्जीपणा दाखवत आहेत त्यांच्यावर कारवाई करा, असा आदेश त्यांनी या वेळी प्रशासनाला दिला.