भाजप हा गुंडांचा तर शिवसेना खंडणीखोरांचा पक्ष असल्याची घणाघाती टीका काँग्रेस पक्षाचे नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ते शुक्रवारी पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षांवर सडकून टीका केली. हे दोन्ही पक्ष केवळ निवडणुकीपुरती बनवाबनवी करतात. याबाबतीत देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांनी अशोक सराफ आणि सचिन पिळगावकर यांनादेखील मागे टाकले आहे, असे विखे म्हणाले. पुण्यातील बिल्डर आणि भाजप नेत्यांमध्ये संगनमत आहे. भाजपचा विकास आराखडा हा त्याचा ढळढळीत पुरावा असल्याचा आरोपही त्यांनी केला.

केंद्र आणि राज्य सरकारने आतापर्यंतच्या कारकीर्दीत घेतलेल्या निर्णयांबद्दलचा रोष या निवडणुकीत पाहायला मिळणार आहे. सध्या शिवसेना आणि भाजपमध्ये सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या सत्रात मुख्यमंत्र्यांनी खालच्या स्तरावर जाऊन बोलणे, हे राज्यासाठी दुर्देवी आहे. दोन्ही पक्ष एकमेकांची औकात काढण्यातच धन्यता मानत आहेत. मात्र, जनता २३ तारखेला त्यांची खरी औकात दाखवून देईल. शिवसेनेच्याबाबतीत बोलायचे झाले तर त्यांनी स्वाभिमान गहाण ठेवला आहे, असे म्हणावे लागेल. तर पारदर्शक कारभाराची भाषा करणाऱ्या भाजपने सिंहगडावर जाताना टोल भरला नाही, यामधून त्यांचा पारदर्शक बाणा दिसून येतो. सध्या भाजपने गुंडांना घेऊन समाजसेवेला सुरूवात केली आहे, असा टोलाही विखे-पाटील यांनी लगावला. दरम्यान, मध्यावधी निवडणुकांची वेळ आल्यास काँग्रेस त्यासाठी सज्ज असल्याचे त्यांनी म्हटले. मात्र, सरकार पाडण्यात आमची कोणतीही भूमिका नसेल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.