महापालिकेच्या मिळकत कराचा भरणा ३१ मे पर्यंत भरल्यास करात यंदाही पाच ते दहा टक्के सवलत दिली जाणार असून कर भरण्याची सुविधा बँकांमध्येही उपलब्ध करून देण्यात आली आहे.
मिळकत कर भरणा करण्यासाठी महापालिकेच्या मिळकत कर विभागाची कार्यालये एप्रिल व मे महिन्यात प्रत्येक शनिवार व रविवारी तसेच शासकीय सुटय़ांच्या दिवशीही सकाळी दहा ते दोन या वेळेत सुरू ठेवली जाणार आहेत. महापालिकेच्या मुख्य भवनासह सर्व क्षेत्रीय कार्यालये, संपर्क कार्यालये, कर आकारणी व कर संकलन कार्यालये येथे मिळकत कर भरता येणार आहे. त्या  बरोबरच मिळकत कराचा भरणा एचडीएफसी आणि कॉसमॉस बँकेतही करता येईल.
मिळकत करातील सूट यंदाही कायम ठेवण्यात आली असून ३१ मे पर्यंत कर भरल्यास ही सूट मिळेल. ज्यांची वार्षिक करपात्र रक्कम २५ हजार रुपयांपर्यंत आहे, त्यांना सर्वसाधारण करात १० टक्के आणि वार्षिक करपात्र रक्कम २५ हजार रुपयांच्या पुढे असणाऱ्यांना सर्वसाधारण करात पाच टक्के एवढी विशेष सूट देण्यात येणार असल्याचे महापालिकेने कळवले आहे. सन २०१५-१६ या आर्थिक वर्षांतील पहिल्या सहामाहीचा कर ३० जून पर्यंत न भरल्यास १ जुलैपासून मिळकत कर थकबाकीवर दोन टक्के दंडाची आकारणी केली जाईल. तसेच दुसऱ्या सहामाहीचा कर जुलै ते डिसेंबर या कालावधीत न भरल्यास १ जानेवारी २०१६ पासून दोन टक्के दंडाची आकारणी केली जाणार आहे. दंड टाळण्यासाठी नागरिकांनी कर वेळेत भरून सहकार्य करावे असेही आवाहन करण्यात आले आहे.
मिळकत कराबाबत तक्रारी, अडचण असल्यास महापालिका मुख्य भवन, मिळकत कर कार्यालय, तळ मजला येथे वा मिळकत कर तक्रार निवारण केंद्र येथे २५५०११५९ या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.