News Flash

पोलिसांच्या भरकटलेल्या मुलांसाठी ‘सुसंवाद तरुणाई’शी

पोलिसांची मुले भरकटू नयेत म्हणून पुणे पोलिसांच्या संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाने ‘सुसंवाद तरुणाई’शी हा उपक्रम हाती घेतला असून...

पोलिसांच्या कामाच्या वेळा निश्चित नसतात. त्यांना कुटुंबासाठी द्यायला वेळही नसतो. त्यातूनच पोलिसांची मुले (लाइन बॉइज) वाममार्गाला लागतात. पोलिसांची मुले भरकटू नयेत म्हणून पुणे पोलिसांच्या संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाने ‘सुसंवाद तरुणाई’शी हा उपक्रम हाती घेतला असून त्या अंतर्गत मुलांना व्यवसाय, कौटुंबिक समस्यांचे निराकरण याविषयी मार्गदर्शन करण्यात येत आहे. या मुलांना मार्गदर्शन करण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मदतीने हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे.
पोलिसांचे काम म्हणजे ऑन डय़ुटी चोवीस तास. कामाच्या वेळा निश्चित नसल्यामुळे मुलांकडे लक्ष देण्यासाठी त्यांना वेळ नसतो. मुलांसोबत संवाद साधायला वेळ नसतो. त्यामुळे त्याचा परिणाम कुटुंबावर होतो. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीकडेही दुर्लक्ष होते. त्यामुळे पोलिसांची मुले वाममार्गाला लागल्याची शेकडो उदाहरणे आहेत. तीन वर्षांपूर्वी पुणे शहरातील टोळीयुद्धातून कुणाल पोळ याचा खून करण्यात आला होता. त्याच्या खुनाचा बदला घेण्यासाठी गेल्या वर्षी भरदिवसा रविवार पेठेतील कस्तुरे चौकात अजय शिंदे याच्यावर गोळीबार करण्यात आला होता. या गोळीबारात त्याची मैत्रीण जखमी झाली होती. पोळ आणि शिंदे ही दोघेही पोलिसांची मुले आहेत. पोलिसांची मुले गुन्हेगारीत शिरल्यामुळे अशा प्रकारांची गंभीर दखल घेत पोलीस महासंचालक प्रवीण दीक्षित यांनी उपाययोजना करण्याच्या सूचना दिल्या होत्या.
त्याचाच एक भाग म्हणून पुणे पोलिसांच्या संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाने (अॅण्टी गुंडा स्वाड) सुसंवाद तरुणाईशी हा उपक्रम हाती घेतला आहे. शहरातील विविध पोलीस वसाहतीत जाऊन पोलिसांच्या मुलांच्या अडचणी जाणून घेण्यात येणार आहेत; तसेच त्यांना शैक्षणिक आणि व्यवसायाबाबतचे मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटित गुन्हेगारीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयसिंह गायकवाड यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.
या उपक्रमांतर्गत स्वारगेट पोलीस वसाहतीत नुकतेच मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. पंजाबराव देशमुख, मलसिद्ध कुमठाळे यांनी पोलीस भरती विषयक मार्गदर्शन केले. तर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योग मार्गदर्शन केंद्राचे सहायक संचालक राजेंद्र गोडबोले यांनी नोकरी, व्यवसायासंदर्भात मार्गदर्शन केले. समुपदेश उमा माने यांनी पोलिसांची मुले व त्यांच्या समस्या याविषयी मार्गदर्शन केले. युवा व्याख्याते गणेश शिंदे यांचे या निमित्ताने शिवचरित्रावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अतिरिक्त पोलीस आयुक्त सी. एच. वाकडे, उपायुक्त पी. आर. पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र जोशी, मिलिंद मोहिते या प्रसंगी उपस्थित होते. हा उपक्रम राबविण्यासाठी धनकवडीतील आदर्श मित्रमंडळाचे उदय जगताप यांनी साहाय्य केल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

पुणे शहरातील सर्व पोलीस वसाहतींमध्ये ‘सुसंवाद तरुणाईशी’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्या अंतर्गत एक फॉर्म छापण्यात आला आहे. पोलिसांच्या मुलांपुढे नेमक्या काय समस्या आहेत, याविषयीची माहिती संकलित करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी हेल्पलाइन (दूरध्वनी- ०२०- २५४५१८८०) सुरू करण्यात आली आहे. समुपदेशक उमा माने, डॉ. सुभाष बोरा हे या उपक्रमात मार्गदर्शन करणार आहेत.
विजयसिंह गायकवाड, पोलीस निरीक्षक (संघटित गुन्हेगारीविरोधी पथक)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2016 3:20 am

Web Title: police wandered kids harmony youth
टॅग : Kids
Next Stories
1 आत्मचरित्रावरील मान्यवरांच्या पत्रांचा संग्रह वाचकांच्या भेटीला
2 चिंचवडच्या रामनगर प्रभागाची पोटनिवडणूक १७ एप्रिलला
3 उन्हाळी रानमेव्याचा आनंद
Just Now!
X