अत्यल्प प्रतिसाद, नियोजनाचा अभाव, पक्षांतर्गत गटबाजी, नगरसेवकांचा बहिष्कार आदी कारणांमुळे पिंपरी महिला काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याचा फज्जा उडाला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या पत्नी सत्त्वशीला चव्हाण यांच्यासमोरच ही फटफजिती झाली. मोकळे सभागृह व रिकाम्या खुच्र्या पाहू नयेत म्हणून पत्रकारांना तसेच छायाचित्रकारांना संयोजकांकडून अटकाव करण्यात आला.
विधानसभा निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर, महिला शहराध्यक्षा ज्योती भारती व श्यामला सोनवणे यांच्या पुढाकाराने होणारा हा मेळावा सकाळी नऊ वाजता सुरू होणार होता. मात्र, साडेदहा वाजले तरी शंभराच्या आतच उपस्थिती होती. त्यामुळे उद्घाटन लांबणीवर पडले. स्थानिक नेते फिरकले नाहीत, नगरसेवकांनी बहिष्कार टाकला. या मेळाव्याचे वार्ताकन करण्यासाठी आलेल्या माध्यमांच्या प्रतिनिधींना सभागृहात बसण्यास अटकाव करण्यात आला. कॅमेरे बाहेर काढू नका, अथवा ते जप्त करण्यात येतील, असा सज्जड दमही संयोजकांनी भरला. यासंदर्भात, सायंकाळी पत्रकार परिषदेत बोलताना, आमचे प्रशिक्षण होते, मेळावा नव्हता, पक्षसंघटन मजबूत करण्यासाठी आयोजित कार्यशाळा होती, अशी सारवासारव संयोजकांकडून करण्यात आली.