प्रकाश जावडेकर यांची घोषणा; जन्मशताब्दीनिमित्त अभिवादन कार्यक्रम

पुणे : आकाशवाणीचे संगीत संमेलन यापुढे ‘भारतरत्न पं. भीमसेन जोशी आकाशवाणी संगीत संमेलन’ या नावाने ओळखले जाईल, अशी घोषणा माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी शनिवारी केली.

स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आर्य संगीत प्रसारक मंडळातर्फे आयोजित ‘अभिवादन’ कार्यक्रमात जावडेकर बोलत होते. जावडेकर यांच्यासह माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, महापौर मुरलीधर मोहोळ आणि भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष विनय सहस्रबुद्धे यांच्या हस्ते अच्युत पालव यांनी साकारलेल्या बोधचिन्हाचे प्रकाशन करण्यात आले.

जावडेकर म्हणाले, ‘अटलजींच्या काळात पंडितजींना ‘भारतरत्न’ देण्यात आला. अशा कलाकारांमुळे देशाची मान उंचावते. भीमसेनजींचे संगीत हा भारताचा ठेवा असून त्यांचे गाणे हेच त्यांचे स्मारक आहे.’

आकाशवाणी आणि दूरदर्शनने त्यांच्या संगीताचा खजिना यापूर्वीच जनतेसाठी खुला केला असून लवकरच तो लोकांपर्यंत सहजपणे पोहोचावा यासाठी त्याची फेररचना करण्यात येणार आहे, असेही जावडेकर यांनी सांगितले.

पवार म्हणाले,‘संगीताद्वारे समाजाची अखंड सेवा करण्यासाठी पंडितजींनी आयुष्य वेचले. राजकीय क्षेत्रात काम करताना मराठी आणि कानडी अशा वादात अडकवले जाते. पण, हे अंतर न ठेवता संगीताच्या माध्यमातून एकसंध ठेवण्याची कामगिरी पंडितजींनी केली. देशाच्या सीमेबाहेर त्यांचा आवाज पोहोचला अशी दोन व्यक्तिमत्वं आहेत, एक पंडितजी आणि दुसरे लता मंगेशकर. जोपर्यंत चंद्र-सूर्य मावळत नाहीत तोपर्यंत त्यांचे सूर अबाधित राहतील. सवाई गंधर्व महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी नव्या कलाकारांना प्रोत्साहन दिले. यशवंतराव चव्हाण यांच्या दिल्लीतील घरी पंडितजींची मैफील व्हायची. एकेकाळी आकाशवाणीद्वारे संगीत सर्वदूर पोहोचायचे. त्यातूनच पंडितजीची ‘संतवाणी’ आणि बाबूजींचे ‘गीतरामायण’ घराघरात पोहोचले.’

पंडितजींच्या नावाने पाठ्यवृत्ती : परदेशातून शास्त्रीय संगीत शिकण्यासाठी भारतामध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांला भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेतर्फे दीड लाख रुपयांची ‘स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी पाठ्यवृत्ती’ देण्याची घोषणा विनय सहस्रबुद्धे यांनी केली. शास्त्रीय संगीताचे व्याकरणअबाधित ठेवून त्याला लोकप्रियतेच्या शिखरावर नेण्याचे श्रेय पंडितजींना जाते. किराणा घराण्याचे असूनही घराण्याच्या बंदिस्ततेमध्ये ते अडकले नाहीत. संगीतातील घराणेशाहीला त्यांनी जुमानले नाही, अशा शब्दांत त्यांनी गौरव केला.