पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्पासाठी हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट अ‍ॅथॉरिटी – पीएमआरडीए) या प्रकल्पासाठीच्या हरकती मागवण्यात आल्या आहेत. त्यासाठीचे निवेदन शनिवारी प्रसिद्ध करण्यात आले आहे.

हायपरलूप प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी ‘व्हर्जिन हायपरलूप वन’ या अमेरिकन कंपनीने व्यवहार्यता अहवाल तयार केला आहे. पुणे-मुंबई हायपरलूप प्रकल्प नगर विकास विभागाच्या २ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार पायाभूत सुविधा प्रकल्प म्हणून घोषित झाला आहे. तसेच ‘डीपी वर्ल्ड एफझेडई व हायपरलूप टेकनॉलॉजीज आयएनसी’ या भागीदारी कंपनीला ‘मूळ प्रकल्प सूचक’ म्हणून मान्यता देण्यात आली आहे.

या प्रकल्पाची अंमलबजावणी ‘स्विस चॅलेंज पद्धती’ तत्त्वावर करण्यात येत आहे. तसेच प्रकल्पासाठीचा खर्च खासगी गुंतवणुकीतून केला जाणार आहे. प्रकल्प दोन टप्प्यात प्रस्तावित असून पहिल्या टप्प्यात पुणे महानगर क्षेत्रामध्ये चौदा किलोमीटर चाचणी मार्गाची निर्मिती करण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात पुणे-मुंबई या दोन महानगरांना जोडण्यासाठी मार्ग तयार करण्यात येणार आहे.

पीएमआरडीएकडून हाती घेण्यात आलेला हायपरलूप प्रकल्प उच्च तंत्रज्ञानावर आधारित अशा प्रकारचा देशातील पहिला नावीन्यपूर्ण प्रकल्प आहे.

पुणे-मुंबई दरम्यानचे अंतर हायपरलूप प्रकल्पामुळे केवळ तीस मिनिटांत पार करण्याचे उद्दिष्ट असून नागरिकांना सुरक्षित आणि अति वेगवान प्रवासाचा अनुभव घेता येणार आहे. प्रकल्पाबाबत जर कोणाच्या हरकती असतील, तर विहित मुदतीत त्या सादर कराव्यात, असे आवाहन पीएमआरडीएकडून करण्यात आले असल्याची माहिती महानगर आयुक्त किरण गित्ते यांनी दिली.

कोणत्या प्रकारच्या हरकती नोंदवता येणार

हायपरलूप प्रकल्पामुळे हितसंबंधित व्यक्तीला किंवा थेट बाधित  होणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला पुढील तीस दिवसांच्या कालावधीत म्हणजे १८ फेब्रुवारीपूर्वी या प्रकल्पाबाबत हरकती देता येतील. प्रकल्पाच्या मूळ प्रकल्प सूचक असलेल्या व्यक्तीविरुद्ध त्याने मालकीविषयक किंवा बौद्धिक संपदा हक्क स्वत:हून किंवा त्याच्या वतीने दोषपूर्ण रीतीने प्राप्त केला असल्यास हरकती सादर करता येतील. तसेच जाहीर निवेदनात नमूद  प्रकल्पाच्या अन्य विविध बाबींबाबतच्या कारणास्तव हरकती सादर करता येतील. या हरकती पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे मुख्य अभियंता, अभियांत्रिकी क्रमांक २, महाराजा सयाजीराव गायकवाड उद्योग भवन, चौथा मजला, औंध, पुणे- ४११०६७ या पत्त्यावर सादर करायच्या आहेत.