पुण्यातील गंज पेठ परिसरात राहणार्‍या एका महिलेला करोनाचा संसर्ग झाला होता. तिच्यावर रूग्णालयात उपचारही सुरू होते. मात्र या करोनाबाधित महिलेने रूग्णालयातून पळून जात कॅनॉलमध्ये उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक विष्णु ताम्हाणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गंज पेठ परीसरात राहणार्‍या एका ६० वर्षीय महिलेला ३ मे रोजी करोनाचा संसर्ग झाला होता. त्यानंतर तिला बोरा रूग्णालयात कुटुंबीयांनी दाखल केले होते. तिथे करोनावर उपचार घेणार्‍या दोन रुग्णांचा मृत्यू झाला. ते पाहून ही महिला घाबरली आणि मला दुसर्‍या रूग्णालयात दाखल करा, असे कुटुंबीयांना ती सतत सांगत होती. अखेर कुटुंबीयांनी तिला ८ तारखेला दुसर्‍या रूग्णालयात दाखल केले.

मात्र त्याच दरम्यान ती महिला कुटुंबियांना म्हणायची की, माझ्यामुळे तुम्हाला देखील करोना होईल. या मानसिक तणावात ती कायम होती. अखेर तणावातून ९ मे रोजी सकाळच्या सुमारास ती रुग्णालयातून सर्वांची नजर चुकवून बाहेर पडली. लष्कर भागातील सोलापूर बाजारापर्यंत ती गेल्याचे काहीनी सांगितले होते. तिथूनच काही अंतरावर कॅनॉल आहे.
त्यानंतर रुग्णालय आणि आसपासच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यामातून पाहणी केल्यावर ही तीच महिला असल्याचे स्पष्ट झाले. तर, हडपसर परिसरातून वाहणार्‍या कॅनॉलमध्ये एका महिलेचा मृतदेह आढळून आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. घटनास्थळी जाऊन पाहणी केल्यावर हा त्याच महिलेचा मृतदेह असल्याचेही स्पष्ट झाले.