राज्यात करोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. मुंबई, पुणे यांसारख्या शहरांना करोनाचा मोठा फटका बसला आहे. दरम्यान, पुण्यातून एक सुखद बातमी समोर आली आहे. करोनाची बाधा झालेल्या एका महिलेनं महानगरपालिकेच्या रुग्णालयात जुळ्या बाळांना जन्म दिला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली.

पुण्यातही करोनाचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव आहे. दरम्यान, पुण्यातील भवानी पेठ येथे राहणाऱ्या एका महिलेला प्रसुतीसाठी पुणे महानगरपालिकेच्या सोनावणे रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. प्रसुतीपूर्वी करण्यात आलेल्या चाचणीत महिलेचा करोना अहवाल पॉझिटव्ह आल्याचं निदर्शनास आलं होतं. त्यानंतर डॉक्टरांकडून सदर महिलेची विशेष काळजी घेण्यात येत होती. त्यानंतर त्या महिलेनं जुळ्या बाळांना जन्म दिला असून बाळ आणि त्यांची आई सुखरूप असल्याचंही महापौरांनी सांगितलं. तसंच त्यांची विशेष काळजी घेणाऱ्या डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचेही त्यांनी आभार मानले.

यशस्वीपणे प्रसूती करणाऱ्या डॉ. रोकडे, डॉ. चोपडे, डॉ. अग्रवाल, डॉ. आरती, डॉ. अनिता भोसले, डॉ. सृजन आणि एस.एन. चौरे यांचे त्यांनी सर्वांच्यावतीनं आभार मानले. दरम्यान, पुण्यात करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. तसंच पुण्याती करोनाबाधितांची संख्याही आता ५३ हजारांच्या वर पोहोचली आहे.