साडेपंधरा लाख लंपास

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम केंद्रात ठेवलेले एटीएम यंत्र चोरटय़ांनी उचलून नेल्याची घटना पाबळ-शिक्रापूर रस्त्यावर गुरुवारी मध्यरात्री घडली. एटीएम मशिनमध्ये १५ लाख ६२ हजारांची रोकड होती. अवघ्या तीन मिनिटांत चोरटे एटीएम यंत्र जीपमध्ये घालून पसार झाले.

इरप्पा मेलकेरी (वय २९, रा. हडपसर) याने या संदर्भात शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार चोरटय़ांविरुद्ध शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पाबळ-शिक्रापूर रस्त्यावर एटीएम मशिन ठेवण्यात आले होते. स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात गुरुवारी मध्यरात्री चोरटे शिरले. एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक देखील नव्हता. एटीएममध्ये १५ लाख ६२ हजारांची रोकड ठेवण्यात आली होती. एटीएम केंद्रात कोणी नसल्याची खात्री केल्यानंतर चोरटय़ांनी एटीएम मशिन उचलले आणि जवळच लावलेल्या जीपमध्ये नेऊन ठेवले. चोरटे एटीएम घेऊन पसार झाले. सकाळी ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांकडे तक्रार देण्यात आली.  शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गलांडे यांनी एटीएम केंद्राची पाहणी केली. एटीएम केंद्रातील सीसीटीव्ही चित्रीकरण ताब्यात घेण्यात आले आहेत. चोरटय़ांनी अवघ्या तीन मिनिटांत एटीएम यंत्र उचलून जीपमध्ये ठेवले. एटीएम केंद्रात सुरक्षारक्षक नव्हता. पोलिसांकडून एटीएम केंद्रात सीसीटीव्ही कॅमेरे आणि सुरक्षारक्षक नेमण्याची सूचना बँकांना वेळोवेळी दिल्या आहेत. मात्र, अनेक बँकाकडून पोलिसांच्या सूचनांकडे काणाडोळा करण्यात येत आहे.  या संदर्भात पोलीस निरीक्षक गलांडे म्हणाले, की चोरटे जीपमधून पसार झाले असून त्यांचा माग पोलिसांकडून काढण्याचे काम सुरू आहे. अशा प्रकारची घटना काही दिवसांपूर्वी अहमदनगर जिल्ह्य़ात झाली होती. पाबळ भागातील एटीएम यंत्राच्या चोरीत देखील या टोळीचा हात असल्याचा संशय पोलिसांना आहे. एटीएम यंत्रात पाचशे रुपयांच्या ३१३४ नोटा ठेवण्यात आल्या होत्या.

पिंपरी भागात एटीएम केंद्रात चोरीचा प्रयत्न

पिंपरीतील उद्यमनगर भागात स्टेट बँकेच्या एटीएम केंद्रात चोरीचा प्रयत्न झाल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. चोरटय़ांकडून एटीएम यंत्राची तोडफोड करण्यात आली. मात्र, यंत्रातील रोकड चोरटय़ांना लांबवता आली नाही. या प्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल बडे तपास करत आहेत.