25 September 2020

News Flash

पुण्याची कचराकोंडी सामंजस्यानेच फुटेल, महापालिका आयुक्तांना विश्वास

कचराप्रश्नावर लवकरच तोडगा निघेल

पुणे महापालिका आयुक्त कुणाल कुमार (संग्रहित छायाचित्र)

पुणे शहरातील कचराप्रश्नी सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. शहरातील कचराप्रश्न मार्गी लावण्यासाठी उरळी देवाची आणि फुरसुंगीच्या ग्रामस्थांसोबत प्रशासन आणि लोकप्रतिनीधींनी अनेक बैठकी घेतल्या. मात्र, आतापर्यंतच्या सर्व बैठकी निष्फळ ठरल्या आहेत. उरळी देवाची आणि फुरसुंगी याठिकाणी असणाऱ्या कचरा डेपोमध्ये शहरातील कचरा टाकू देणार नाही, या भूमिकेवर तेथील ग्रामस्थ ठाम आहेत. शहरातील कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागा उपलब्ध नसल्यामुळे दिवसेंदिवस शहरातील कचऱ्याचा प्रश्न जटील होत चालला आहे. मात्र, पालिका प्रशासनाकडे प्रशासनाकडे कचराप्रश्नावरील तोडग्यासाठी सामंजस्याशिवाय अन्य कोणाताही पर्याय उपलब्ध नसल्याचे दिसते. कचऱ्याप्रश्नासंदर्भात शुक्रवारी महापालिका आयुक्त कुणाल कुमार म्हणाले की, प्रशासन आणि लोकप्रतिनीधींच्या माध्यमातून या प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आमचे प्रयत्न सुरु आहेत. हा प्रश्न सामंजस्याने सोडविण्याची आवश्यकता आहे. यावेळी त्यांनी कचराप्रश्नावर लवकरच तोडगा निघेल, असा विश्वास देखील व्यक्त केला.

उरुळी देवाची आणि फुरसुंगी येथील ग्रामस्थ मागील एकवीस दिवसापासून तेथील डेपोमध्ये शहरातील कचरा टाकण्यास विरोध करत आहेत. हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी महापौर मुक्ता टिळक यांनी अनेक वेळा ग्रामस्थाशी बैठका घेतल्या. त्या निष्फळ ठरल्या असून या कालावधीत ग्रामस्थ कचरा डेपो कायमचा बंद करावा, या मागणीसाठी महापालिका प्रशासन, महापौर आणि पालकमंत्र्याचा निषेधार्थ आंदोलन करताना दिसत आहे. दुसरीकडे कचऱ्याच्या मुद्यावरुन विरोधीपक्ष सत्ताधाऱ्यांविरोधात आंदोलनाच्या माध्यमातून निषेध नोंदवत आहेत.

महापौर आणि पालकमंत्री पुणेकरांना कचरा कोंडीत सोडून परदेश दौयावर गेल्याने विरोधक अधिक आक्रमकपणे आंदोलन करताना दिसले. काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे यांच्यासह राज्यात आणि केंद्रात सत्तेत असलेल्या शिवसेनेने देखील भाजपच्या कार्यपध्दतीचा निषेध व्यक्त केला आहे. मनसेने महापौरांच्या घरासमोर कचरा फेकून आंदोलन केल्यानंतर गुरुवारी महापालिकेत शिवसेनेकडून महापालिकेसमोर कचरा फेकू आंदोलन करण्यात आले. याशिवाय खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्यावतीने आंदोलन करण्यात आले. शहरात निर्माण झालेल्या कचराप्रश्नी विरोधक आक्रमक झाले असताना सत्ताधारी भाजपच्या एकाही नेत्याने याविषयी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. पालकमंत्री गिरीश बापट पुणेकरांची समस्या सोडविण्याठी कोणती भूमिका मांडणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 5, 2017 6:13 pm

Web Title: pune garbage issue municipal commissioner kunal kumar reaction
Next Stories
1 कचराकोंडी.. तरीही शहर स्वच्छ!
2 कचऱ्याच्या विरोधात राजकीय पक्षांची आंदोलने सुरूच
3 लोकजागर : पाणी कपात का नाही?
Just Now!
X