पुणे शहराला पाणी पुरवठा करणार्‍या चारही धरण क्षेत्रात गेल्या २४ तासांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. त्यामुळे या धरणांच्या पाणी साठ्यात तब्बल तीन टीएमसीने वाढ झाली आहे. दरम्यान, अद्यापही धरण क्षेत्रात पावसाचा जोर कायम असल्याची माहिती पाटबंधारे विभागामार्फत देण्यात आली आहे.

टेमघर, पानशेत, वरसगाव आणि खडकवासला या चार धरणातून पुणे शहराला पाणी पुरवठा केला जातो. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरण क्षेत्र आणि जिल्ह्यात जुलै अखेरपर्यंत पावसाने पाठ फिरविल्याने पाणी प्रश्न गंभीर झाला होता. या पार्श्वभूमीवर काल महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली शहराच्या पाणी नियोजनाबाबत बैठक घेण्यात आली. यामध्ये पाणी कपातीचा निर्णय घेतला जाऊ शकतो, अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, धरण क्षेत्रात पाऊस होत असल्याने आणि आगामी गणेशोत्सव लक्षात घेता सध्या तरी पाणी कपातीचा निर्णय घेतला जाणार नसल्याचे महापौरांनी या बैठकीदरम्यान जाहीर केले. त्यामुळे सध्यातरी पुणेकरांवरील पाणी कपातीचे संकट टळले आहे.

दरम्यान, कालपासून धरण क्षेत्रात दमदार पाऊस होत आहे. काल मंगळवारी सकाळपर्यंत या चारही धऱणांमध्ये मिळून ३४.१६ टक्के आणि ९.१६ टीएमसी एवढा पाणीसाठा शिल्लक होता. त्यानंतर आतापर्यंत धरण क्षेत्रातील जोरदार पावसाने हा पाणीसाठा वाढून ४१.४० टक्के आणि १२.०७ टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. या आकडेवारीवरून चारही धरणात मिळून मागील २४ तासांत ३ टीएमसी एवढा पाणीसाठा धरण क्षेत्रात जमा झाला असल्याचे पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.