राज्यात सध्या एल्गार परिषदेत शरजील उस्मानी याने केलेल्या वादग्रस्तव वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपाने आक्रमक भूमिका घेत, महाविकासआघाडी सरकारवर जोरदार टीका करणे सुरू केलं आहे. या पार्श्वभूमीवर आज(रविवार) पुण्यात वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांना विचारणा करण्यात आल्यावर त्यांनी देखील यावर प्रतिक्रिया दिली.

“त्यांचं जे भाषण आहे ते माझ्या समोर आलेलं नाही. मी एल्गार परिषदेला फारसं महत्वही देत नाही. ते भाषण पाहिल्या शिवाय मी त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही. अगोदरच्या एल्गार परिषदेच्या हेतू वेगळा होता, ते समाजात एकोपा आणण्याचं काम होतं. मात्र त्यानंतर मी अध्यक्ष असताना एल्गार परिषद बरखास्त केली होती. आता उरलेल्या एल्गार परिषदेचा आमचा काही संबंध नाही.” असं प्रकाश आंबेडकर म्हणाले.

पंतप्रधान शेतकर्‍यांसोबत चर्चा करीत नाही, पण ते आसामचा दौरा करत आहेत. याबद्दल बोलताना वंचित प्रकाश आंबेडकर म्हणाले की, हे हुकुमशहा आणि दारुड्याचे सरकार आहे. त्या दारुड्याच्या मनात आलं तर तो कुणाशी बोलतो, मनात आलं नाही की बोलत नाही अशी परिस्थिती आहे.

कृषी कायद्या बद्दल प्रकाश आंबेडकर म्हणाले, २००६ मध्ये राज्य सरकारने केलेला काँट्रॅक्ट फार्मिंगचा कायदा(बाजार समिती) जशाच तसा केंद्राने स्वीकारला आहे. आता राज्य शासनाने हा जर रद्द केला तर केंद्राला कृषी हा विषय राज्याचा असल्याने त्यांना तो लागू करता येत नाही. म्हणून महाराष्ट्र शासनाने तो रद्द करावा याच भूमिकेत आम्ही आहोत व त्याच्या पाठीशी आम्ही आहोत. हा कायदा तुम्ही रद्द का करू शकत नाही, हे शिवसेना, राष्ट्रवादी व काँग्रेसने अगोदर सांगावं. कारण, भाजपा असं म्हणते आहे की महाराष्ट्राचा कायदा आम्ही जसाच तसा देशभर लागू केला आहे. महाराष्ट्राचा कायदा रद्द झाला, तर कृषी हा राज्याचा विषय असल्याने केंद्राला तसा कायदा करता येत नाही, म्हणून तो तिथं गळून पडतो. काँग्रेस, राष्ट्रवादी व शिवसेना हा रद्द का करत नाही? याचा खुलासा या तिन्ही पक्षांनी केला पाहिजे.