गर्दीवर नियंत्रणाबाबत सूचना; नियमावलींची काटेकारेपणे अंमलबजावणी

पुणे : श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डात भाजीपाला तसेच गूळ-भुसार बाजारातील गर्दीला वेसण घालण्यासाठी बाजार समिती अणि पोलीस प्रशासनाकडून उपाययोजना करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी बाजारआवाराची पाहणी करून गर्दीवर आणखी नियंत्रण आणण्याची गरज असल्याचे मत व्यक्त करून काही सूचना दिल्या आहेत. त्यानुसार बाजार समितीकडून बुधवारपासून (२१ एप्रिल) नियमावलीचे काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

बुधवारपासून बाजारात रात्री नऊ ते पहाटे चार या वेळेत शेतीमाल घेऊन येणाऱ्या वाहनांना प्रवेश देण्यात येणार आहे. शेतीमाल गाळ्यावर उतरविल्यानंतर वाहने घेऊन त्वरित बाहेर पडावे. बाजारातील शेतीमाल विक्रीची वेळ पहाटे तीन ते दुपारी दोन अशी ठेवण्यात आली आहे. मार्केट यार्डातील बटाटा विभाग, आंबा शेड, डाळिंब यार्ड, तरकारी विभागातील कामकाज पहाटे तीन ते दुपारी दोन या वेळेत सुरू राहणार आहे. बाजार समितीने निर्धारित केल्यानुसार अडते, कामगार यांच्याकडील ओळखपत्र तपासून प्रवेशद्वार क्रमांक एक आणि प्रवेशद्वार क्रमांक चारमधून प्रवेश देण्यात येणार आहे, असे पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी सांगितले.

शेतीमाल खरेदीसाठी आलेले वाहनांना दुपारी दोननंतर बाजारआवारात थांबण्यास मज्जाव करण्यात आला आहे. बाजारात शेतीमाल गोणी किंवा प्लास्टिक जाळीतून (क्रेट्स) विक्रीस आणावा. गोणीमध्ये न भरता आणलेला शेतीमाल स्वीकारला जाणार नाही. बाजारात रिकामी वाहने उभी करू नये. अन्यथा वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. बाजारात घाऊक स्वरूपात खरेदी करणाऱ्या परवानाधारकास प्रवेश देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले

भुसार बाजाराचे कामकाज सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत

मार्केट यार्डातील गूळ आणि भुसार बाजाराचे कामकाज सोमवार ते शुक्रवार दरम्यान सकाळी नऊ ते सायंकाळी सहापर्यंत सुरू राहणार आहे. शनिवार आणि रविवारी टाळेबंदी असल्याने भुसार बाजाराचे कामकाज बंद राहणार असल्याचे भुसार बाजारातील व्यापाऱ्यांची शिखर संघटना असलेल्या दी पूना र्मचट्स चेंबरचे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल आणि सचिव विजय मुथा यांनी सांगितले.

पोलीस आयुक्तांकडून सूचना

मार्केट यार्डातील गर्दी नियंत्रणासाठी पोलीस आणि बाजार समिती प्रशासनाची नुकतीच बैठक आयोजित करण्यात आली होती. गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्या असल्या, तरी बाजारातील गर्दी आणखी नियंत्रणात आणायला हवी, अशा सूचना पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिल्या आहेत.

अडत्यांनी निर्धारित केलेल्या वेळेत शेतीमालाची विक्री करावी.  गाळ्यासमोरील पंधरा फुटांपर्यंत किंवा मोकळ्या जागेत शेतीमाल उतरवू नये. गाळ्यावर किरकोळ स्वरूपाची विक्री होत असल्याचे आढळून आल्यास गाळेधारकाचा परवाना रद्द करण्यात येईल. करोनाच्या संसर्गाला अटकावासाठी बाजारातील प्रत्येक घटकाने नियमावलीचे कडक पालन करणे गरजेचे आहे.

मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती