News Flash

सुरक्षितपणे चालता यावे!

हे पादचारी धोरण तयार करण्यात इनामदार यांच्यासह इतर काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता.

पादचारी धोरणाविषयी पालिकेच्या अनास्थेबद्दल सुज्ञ पुणेकरांची नाराजी

नागरिकांना प्रत्यक्षात वापरण्याजोगे आणि सुरक्षित पदपथ गरजेचे असून पालिकेने पादचारी धोरणाबद्दल गांभीर्याने पावले उचलणे अपेक्षित आहे, असे मत ‘पादचारी प्रथम संघटने’चे निमंत्रक प्रशांत इनामदार यांनी व्यक्त केले. या धोरणाच्या अंमलबजावणीविषयी आपण आयुक्तांकडे अनेक दिवसांपासून भेट मागतो आहोत, परंतु अद्याप ही बैठक होऊ शकलेली नाही, असेही त्यांनी सांगितले.

हे पादचारी धोरण तयार करण्यात इनामदार यांच्यासह इतर काही कार्यकर्त्यांनी पुढाकार घेतला होता. हे धोरण अतिशय सोपे असून त्यात पादचाऱ्यांसाठीच्या सोईसुविधांसंबंधी गोष्टी विस्ताराने मांडण्यात आल्या आहेत, असे सांगून इनामदार म्हणाले, ‘‘पदपथावर चढल्यानंतर नागरिकांना जिथपर्यंत जायचे आहे तिथपर्यंत सलग आणि सुरक्षितपणे चालत जाता येणे गरजेचे आहे. चालताना सतत अडथळे आल्यास नागरिकांना सारखे रस्त्यावर उतरावे लागते. परिणामी पदपथाऐवजी रस्त्यावरूनच चालण्याकडे त्यांचा कल राहतो. यात चालणाऱ्याच्या जिवाला तर धोका निर्माण होतोच, शिवाय रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांनाही अडथळा येतो. पदपथावरून किती लोक चालणार आहेत हे लक्षात घेऊन त्याची रुंदी ठरायला हवी. केवळ करायचा म्हणून दीड मीटर रुंदीचा पदपथ करून उपयोग नाही’’ पदपथावर अडथळे वा अतिक्रमण नसावे, ज्येष्ठ नागरिक घसरून वा ठेचकळून पडतील अशी रचना नसावी, असेही त्यांनी सांगितले.

* लोकसत्ता’च्या पाहणीत काय दिसले..

* फग्र्युसन रस्ता- गोखले चौकापासून फग्र्युसन महाविद्यालयाच्या दिशेने जाणाऱ्या पदपथावर चक्क बाथरूम टाईल्ससारख्या टाईल्स बसवल्या आहेत. या टाईल्सवरून चप्पल वा बूट घसरतात. धडपडण्याच्या भीतीने ज्येष्ठ नागरिकांना रस्त्यावर उतरूनच चालावे लागत होते. गोखले चौकाकडून डेक्कन स्थानकाकडे जाणाऱ्या पदपथाचीही अवस्था वाईट असून त्याची उंची थोडय़ा अंतरासाठी कमी, तर थोडय़ा अंतरासाठी अधिक आहे. काही ठिकाणी मोठाली ड्रेनेजची झाकणे मध्येच आली आहेत.

* शास्त्री रस्ता- पदपथावरील चढउताराबद्दल शास्त्री रस्त्यावरील पदपथही अपवाद नाही. काही ठिकाणी पदपथ तिरके, रस्त्याकडे उतार असलेलेही आहेत.

* बाजीराव रस्ता- या रस्त्यावरील पदपथाची रुंदी अनेक ठिकाणी चालण्यास खूप कमी पडते असे दिसून आले. एका वेळी दोनपेक्षा अधिक नागरिकांना चालणे शक्य होत नाही. शिवाय पदपथाची उंचीही कमी-अधिक असल्याचे दिसले.

* टिळक रस्ता- या रस्त्यावरील जवळपास सर्व बस स्टॉप हे पदपथावरच येतात. बससाठी थांबलेल्या नागरिकांची तुडुंब गर्दी पाहता पदपथावरील पादचाऱ्यांना खाली उतरून चालावे लागते व सारखे चढणे व उतरण्याचे काम करण्यापेक्षा अनेक जण रस्त्यावरून चालणे पसंत करतात. मुळात या रस्त्याचीच रुंदी फारशी नसल्यामुळे या ठिकाणी रस्त्यावरून चालणाऱ्या गर्दीचा प्रश्न मोठा आहे.

* जंगली महाराज रस्ता- झाशीची राणी चौकापासून गरवारे चौकापर्यंत जाताना बऱ्याच ठिकाणी पदपथ गायब आहे. त्यामुळे सलग चालण्यासाठी पदपथ मिळत नाही. पदपथाच्या कमी-अधिक उंचीचा प्रश्न या रस्त्यावरही जाणवतो.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2016 4:09 am

Web Title: pune residents displeasure over pedestrian policy indifference by pmc
Next Stories
1 पादचारी सुरक्षा धोरण कागदावर, पादचारी वाऱ्यावर
2 प्रेमप्रकरणातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार
3 खाऊखुशाल : रामनाथ
Just Now!
X