चारित्र्याचा संशय आणि मतिमंद मुलाच्या आजारपणाला कंटाळून पतीने पत्नी आणि मुलाचा निर्घृण खून केल्याची घटना पाषाण येथील निम्हण मळा परिसरात मंगळवारी घडली. या दुहेरी खुनानंतर पतीने घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली. नातेवाइकांकडे गेल्यामुळे मुलगी बचावली आहे.
आरती राजू गायकवाड (वय ३७) आणि मुलगा विशाल राजू गायकवाड (वय १९, दोघेही रा. अंजनी निम्हण चाळ, निम्हण मळा, पाषाण) अशी खून झालेल्या माय-लेकाची नावे आहेत. हे खून केल्यानंतर राजू गायकवाड (वय ४२) याने आत्महत्या केली. आरती गायकवाड यांचा मावसभाऊ आनंद दिलीप नाईक (वय ३५, रा. िपपळे सौदागर) यांनी चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजू गायकवाड हा बेकार असून त्याला दारू पिण्याचे व्यसन होते. पत्नी आरती, मतिमंद मुलगा विशाल आणि १४ वर्षांची मुलगी शुभांगी यांच्यासमवेत गेल्या दहा वर्षांपासून तो पाषाण येथील निम्हण मळा परिसरात राहत होता. विशाल याच्या आजारपणामुळे राजू गायकवाड वैफल्यग्रस्त होता. गेल्या काही दिवसांपासून तो पत्नीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. मंगळवारी (२७ ऑक्टोबर) राजू याची पत्नी आरती हिच्याशी वादावादी झाली. रागाने बेभान झालेल्या राजू याने आरती हिच्यावर कु ऱ्हाडीने सपासप वार केले. त्यामध्ये आरती जागीच ठार झाली. त्यानंतर राजू याने झोपेत असलेल्या विशाल याचा गळा दाबून खून केला. या दुहेरी खुनानंतर राजूने घरातच दोरीने गळफास लावून घेत आत्महत्या केली.
गायकवाड यांच्या घरातून सकाळी कोणाचाही आवाज आला नाही. त्यामुळे शेजाऱ्यांना संशय आला. शेजाऱ्यांनी आरती हिची सावत्र बहीण अश्विनी दिलीप नाईक (वय ३०, रा. संजय गांधी वसाहत, लमाण तांडा, पाषाण) यांना या घटनेची माहिती दिली. त्यांनी चतु:शृंगी पोलिसांना कळविले. सहायक पोलीस आयुक्त धनराज वाळुंजकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरुण सावंत, सहायक निरीक्षक विक्रम गौड, उपनिरीक्षक नितीन नम यांनी घटनास्थळी भेट दिली.
शुभांगी बचावली
राजू गायकवाड याने पत्नी आरती आणि मतिमंद मुलगा विशाल यांचा मध्यरात्री खून केल्याचा संशय पोलिसांना आहे. गायकवाड दांपत्याची मुलगी शुभांगी (वय १४) ही आठवीमध्ये शिकत आहे. शुभांगी ही तिच्या आईचे मामा सुजय चंदनशिवे (रा. संजय गांधी वसाहत, पाषाण) यांच्याकडे राहायला गेली होती. त्यामुळे ती बचावली आहे. पोलिसांनी गायकवाड यांच्या घराच्या दारामध्ये रक्ताने माखलेली कु ऱ्हाड जप्त केली आहे.