मुंबई दक्षिण मध्य मतदारसंघातून आपण लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी जाहीर केले आहे. पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी ही घोषणा केली. दरम्यान, या मतदारसंघात सध्या शिवसेनेचे राहुल शेवाळे हे खासदार आहेत. मात्र, शिवसेना आणि भाजपा एकत्र आल्यास सेना ही जागा माझ्यासाठी सोडेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

युतीने दक्षिण मुंबई आणि साताऱ्याची जागा रिपाइंसाठी सोडावी अशी जाहीर मागणी यावेळी आठवले यांनी केली आहे. तसेच उदयनराजे भोसले यांना राष्ट्रवादीने तिकीट न दिल्यास आम्ही त्यांना तिकीट देऊ आणि निवडून आणू. याबाबत उदयनराजेंशी बोलणार होतो मात्र, ते सध्या दिल्लीत असल्याने त्यांच्याशी याबाबत चर्चा होऊ शकली नाही, असेही यावेळी ते म्हणाले.

आठवले म्हणाले, वंचिताचा पक्ष तयार करण्याचा काही जण प्रयत्न करीत आहेत. मात्र, ते वंचितांना वंचित करणार आहेत. भारिप आणि एमआयएमचा भाजपाला काही फटका बसणार नाही. तर उलट अधिक फायदा होणार आहे. समाजातील प्रत्येक घटकाला विचारून मी भाजपासोबत गेलो आणि मंत्रीपद घेतले आहे. मी ज्याच्या सोबत गेलो त्यांची सत्ता आली हा आजवरचा इतिहास आहे. त्यामुळे पुन्हा मोदी सरकारच सत्तेत येणार आहे.

काही प्रमाणात पेट्रोल-डिझेलचे दर कमी झाले आहेत. ही चांगली बाब असून आता सरकारने पेट्रोल-डिझेल जीएसटीमध्ये आणल्यास याचे दर किमान ३० रुपयांनी दर कमी होतील, अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे त्यांनी इंधन जीएसटीच्या कक्षेत आणण्याची मागणी केली आहे. तसेच मराठा समाजाच्या आरक्षणाचा मुद्दा आपण एनडीएच्या बैठकीत मांडणार असून मराठा समाजाची भावना लक्षात घेता कायदा करण्याची वेळ आली आहे. यावर सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार राज्य सरकारने भूमिका मांडावी, अशी मागणीही यावेळी आठवले यांनी केली.