महापालिका शिक्षण मंडळाच्या खरेदीमध्ये गैरव्यवहार झाल्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी यांनी राजीनामा द्यावा, असा आदेश बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चौधरी यांना देण्यात आला. या आदेशानुसार ते गुरुवारी (२२ मे) त्यांच्या पदाचा राजीनामा देतील.
शिक्षण मंडळाकडून खरेदीच्या बहुतेक सर्व प्रकरणांमध्ये गैरव्यवहार होत असल्याचे आरोप होत असून त्यांची वेळोवेळी चौकशीही झाली आहे. गेल्या महिन्यात शाळांसाठीच्या कुंडय़ा खरेदीमध्येही गैरव्यवहार झाल्याचे स्पष्ट झाले आहे. या गैरव्यवहाराबाबतची तक्रार नगरसेवकांनी केल्यानंतर महापालिका अतिरिक्त आयुक्तांची चौकशी समिती नेमण्यात आली होती. एकूण प्रकार हा पूर्वनियोजित व संशयास्पद असून हा निधीच्या अपहाराचा प्रयत्न होता. या सर्व प्रक्रियेची स्वतंत्र अधिकारी नियुक्त करून चौकशी करावी व पुढील कारवाई करावी, असे या अहवालात स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे.
शिक्षण मंडळातील या प्रकाराबाबत राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक बुधवारी बोलावण्यात आली होती. शहराध्यक्ष, खासदार वंदना चव्हाण, पक्षाचे प्रवक्ते अंकुश काकडे, आमदार अनिल भोसले, सभागृहनेता सुभाष जगताप यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कुंडय़ांच्या खरेदीत कोणताही गैरप्रकार झालेला नाही. त्यात माझी कोणतीही चूक नाही, असा दावा मंडळाचे अध्यक्ष चौधरी यांनी या बैठकीत केला. चौधरी यांच्या दाव्यानंतर त्यांनी जरी असा खुलासा केलेला असला, तरी त्यांच्या कार्यकाळात हे प्रकरण घडल्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारावर राजीनामा द्यावा, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला. चव्हाण यांनी तशी माहिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळवली आहे. मंडळाच्या कुंडय़ा खरेदीबाबत झालेल्या आरोपांनंतर तसेच चौकशी समिती स्थापन झाल्यानंतर या प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसची बैठक यापूर्वीही झाली होती. मात्र, आयुक्तांचा अहवाल येईपर्यंत कोणताही निर्णय घेऊ नये, असा निर्णय त्या बैठकीत घेण्यात आला होता.