शहराच्या विकास आराखडय़ामध्ये ज्या ठिकाणी हरित पट्टे (ग्रीन बेल्ट) दाखवण्यात आले आहेत, त्या ग्रीन बेल्टमधून रस्ते प्रस्तावित करण्याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अभ्यास समितीकडून प्रस्ताव तयार केला जाणार आहे. मात्र, हा प्रस्ताव म्हणजे मूळ वादग्रस्त विकास आराखडा परवडला असा प्रकार होईल अशी चर्चा आहे.
विकास आराखडय़ात झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी, तसेच योग्य त्या दुरुस्त्या सुचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसने पाच नगरसेवकांची आराखडा अभ्यास समिती नियुक्त केली आहे. या समितीने १५ जूनपर्यंत अहवाल द्यायचा असून समितीची पहिली बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीची माहिती समितीचे अध्यक्ष बापूराव कर्णे गुरुजी आणि समितीचे सदस्य शिवलाल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली. विकास आराखडय़ात जेथे नदीकाठाने हरित पट्टे दाखवण्यात आले आहेत, तेथे रस्ते केल्यास शहरातील महत्त्वाच्या रस्त्यांवर वाहनांची जी गर्दी होते ती कमी होईल. त्यामुळे हरित पट्टय़ांमधून रस्ते आखण्याबाबत आम्ही प्रस्ताव तयार करत आहोत, असे पत्रकार परिषदेत सांगण्यात आले.
नियमानुसार हरित पट्टय़ांमध्ये बांधकामे वा रस्ते करता येत नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीने सुचवलेल्या रस्त्यांच्या प्रस्तावाबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. हा प्रस्ताव म्हणजे आधीचा वादग्रस्त ठरलेला आराखडा परवडला असा प्रकार असल्याची प्रतिक्रिया उमटली आहे. नदीचे काठ सुरक्षित राहावेत यासाठी नदीकाठाने हरित पट्टे दर्शवले जातात. त्यामुळे त्यातून रस्ते आखण्याची योजना कशी करता येईल, असाही प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे.