नव्या वर्षांमध्ये ‘रेडीरेकनर’चे दर वाढण्याची शक्यता असल्यास वर्षांच्या शेवटी जुन्या दराने सदनिकांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर होत असल्याचे मागील अनेक वर्षांचे चित्र यंदा पालटले आहे. जानेवारी २०१६ पासून  ‘रेडीरेकनर’चे दर वाढून घरे महाग होण्याचे संकेत असतानाही राज्यातील नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयांमध्ये दस्त नोंदणीत घट होताना दिसते आहे. मागील वर्षी नोव्हेंबर महिन्याच्या तुलनेत यंदा नोव्हेंबरमध्ये तीस हजारांनी दस्त नोंदणी कमी झाली. डिसेंबरमध्ये ती आणखी कमी होण्याची चिन्हं आहेत. सदनिकांची खरेदी मोठय़ा प्रमाणावर घटली असल्याने हे चित्र दिसून येत असून, त्यामुळे बांधकाम क्षेत्रातील मंदीवर शिक्कामोर्तबच झाले असल्याचे या क्षेत्रातील जाणकारांचे मत आहे.
मालमत्तेच्या खरेदी-विक्रीतून राज्य शासनाला सुमारे २० हजार कोटी रुपयांचा महसूल मिळतो. दरवर्षी महसूल वाढीचे लक्ष्य शासन देत असल्याने रेडीरेकनरचे दर वाढविण्याकडे या विभागाचा कल असतो. त्यानुसार २०१६ मध्ये रेडीरेकनरमधील दरांमध्ये १० ते १५ टक्क्य़ांनी वाढीचा प्रस्तावही शासनाकडे पाठविण्यात आला आहे. पुढील वर्षी किमती वाढणार असल्यास जुन्या वर्षांच्या अखेरीला कमी किमतीमध्ये घरे घेण्याकडे अनेकांचा कल असतो. त्यामुळे साधारणत: नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यामध्ये मोठय़ा प्रमाणावर घरांच्या खरेदी- विक्रीचे व्यवहार होत असल्याचे दिसून येत होते. त्यामुळे साहजिकच नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयामध्येही व्यवहार करून घेणाऱ्यांची गर्दी वाढत होती.
यंदाच्या वर्षी मात्र नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयांमध्ये वेगळेच चित्र पाहायला मिळत आहे. पुढील वर्षी घरांच्या किमती वाढणार असल्याची शक्यता आहे. मात्र खरेदी-विक्री मोठय़ा प्रमाणावर कमी झाली असल्याने त्याचे पडसाद नोंदणी व मुद्रांक शुल्क कार्यालयामध्ये दिसून येत आहेत. मागील वर्षीही रेडीरेकनरच्या दरवाढचे संकेत होते. त्यामुळे नोव्हेंबरमध्ये राज्यात १ लाख ८० हजार ३४७ दस्तांची नोंदणी झाली होती, तर डिसेंबरमध्ये हा आकडा २ लाख २५ हजार १७६ वर गेला होता.
सहायक नोंदणी महानिरीक्षक गोविंद गिते यांनी दिलेल्या माहितीनुसार, या वर्षी नोव्हेंबरच्या दस्त नोंदणीमध्ये मध्ये घट झाली असून, यंदा १ लाख ५२ हजार ४०५ दस्तांची नोंदणी झाली. नोव्हेंबरची आकडेवारी पाहता डिसेंबरमध्येही दस्त नोंदणी कमी होण्याची शक्यता आहे. बांधकाम क्षेत्रातील जाणकारांनी याबाबत सांगितले, की नागरिकांकडे पैसे नाहीत म्हणून घरांना मागणी कमी झालेली नाही. लोकांकडे पैसा आहे, मात्र तो वेगळ्या गोष्टींमध्ये गुंतवला जातो आहे. गुंतवणुकीचा कल काहीसा बदलला असल्याने हे चित्र निर्माण झाले असल्याचे काहींचे मत आहे. जुन्या व बांधून पडलेल्या प्रकल्पांना मागणी नसल्याने आता नवे प्रकल्प हाती घेण्यास बांधकाम व्यावसायिक धजावत नाहीत. मात्र, मंदीची ही स्थिती कायमची नाही, त्यात नक्कीच बदल होणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 
यंदाचा दस्त नोंदणीचा उतरता आलेख


महिना—–दस्तसंख्या—– महसूल (कोटीत)
जून——२,०६,८६२—–१६३४.४
जुलै——१,९९,६७९—–१८७३.११
ऑगस्ट—-१,७५,७८०—–१६७२.९६
सप्टेंबर—-१,६८,८७९—–१६७९.१
ऑक्टोबर—१,७१,५७५—–१६०६.३४
नोव्हेंबर—-१,५२,४०५—–१५३२.७९

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Recession in building constructions zone
First published on: 04-12-2015 at 03:27 IST